जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीच्या मूळावर प्रहार ; 13 गुन्हेगारांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई

shivrajya patra

सोलापूर : माळशिरस तालुक्यात संघटीतरित्या गुन्हे करून समाजामध्ये दहशत पसरवलेल्या टोळींतील सराईत 13 गुन्हेगारांविरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या आदेशाने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली. या कारवाईनं जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीच्या मूळावरचा पहिला प्रहार म्हणून पाहिला जातोय.

लक्ष्मण बंदपट्टे आणि ज्ञानेश्वर काळे ही नांवे अकलूज पोलीस ठाण्याच्या दप्तरी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरूध्द वेळोवेळी गुन्हे दाखल आहेत. त्यांनी त्यांच्या साथीदारासह गंभीर गुन्हे केल्याबाबत पोलीस ठाणे अभिलेखावर नोंदी आहेत. बंदपट्टे आणि काळे या गुन्हेगारांची टोळी सक्रीय आहे. 

या टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्यांनी मागील 10 वर्षामध्ये सातत्याने घातक शस्त्रांचा वापर करून खूनाचा प्रयत्न करणे, घातक हत्याराचा वापर करून जबर इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, मालमत्ता जबरीने घेण्याच्या उद्देशाने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, घातक हत्याराने सज्ज होऊन गैरकायदेशीर मंडळी जमवून दंगा करणे, शिवीगाळी-दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे असे शरीराविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत पसरवलेली होती.

गुन्हेगार टोळीतील सदस्यांविरूध्द यापूर्वी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपारी सारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. 14 जून 2025 रोजी या टोळीने संयुक्तरित्या एकत्र येऊन खूनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता. 

त्यावरून अकलुज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी हे संघटीतरित्या एकत्र येऊन टोळीचे वर्चस्व राहावे, त्यातून टोळीस फायदा होण्याच्या उद्देशाने वारवांर गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्यामुळे सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम 1999 या कलमाचे अंतर्भाव होणेबाबचा प्रस्ताव अकलूज पोलीस ठाणे कडून सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाची पडताळणी व अवलोकन करून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम 1999 या कलम 23(1) (अ) प्रमाणे मोक्का कायद्यान्वये कलमांचा अतंर्भाव होण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांना असल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण) यांनी शिफारशीसह प्रस्ताव सादर केला होता.

त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्र) यांनी या गुन्हेगार टोळीतील आरोपीविरूध्द संघटीतरित्या एकत्र येऊन केलेले गुन्हे, गुन्हेगारी पार्श्वभूमी, टोळीचे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवणे, बेहिशोबी मालमत्ता बाळगणे, त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अंकुश लावण्याच्या उद्देशाने या आरोपीना मोक्का कलम लावण्याची मंजुरी दिली.

उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके (अकलुज विभाग, अकलुज) यांच्याकडे  या  गुन्ह्याचा पुढील तपास देण्यात आला आहे.

... चौकट 

मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींची नावे :

1) लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे, (रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज) 

2) बाजीराव हणंमत सरगर (रा. खुडुस, ता. माळशिरस)

3) शंकर अशोक काळे, (रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज), 

4) ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे, 

5) राजु ज्ञानेश्वर काळे, 

6) अर्जुन दत्ता चौगुले, 

7) अतुल दत्तात्रय काळे, 

8) आकाश रमेश धोत्रे, 

9) बाळु भारत मदने, 

10) रोहीत मारूती काळे, 

11) सलीम अब्दुल तांबोळी, 

12) मनोज अशोक काळे आणि 

13) किशोर राजेंद्र नवगन (सर्व रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, ता. माळशिरस)

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर), पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, एस.डी.पी.ओ. संतोष वाळके (अकलुज) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक निरज उबाळे (अकलुज पोलीस ठाणे) यांच्यासह अकलूज पोलीस ठाणेकडील, सपोनि योगेश लंगोटे, पोउपनि, सुधीर खारगे, पोह अमोल बकाल, समीर पठाण, रियाज तांबोळी, हरीष भोसले यांनी पार पाडली.

To Top