जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य जिल्ह्यातून शोध व बचाव कार्यासाठी मनुष्यबळासह मागविल्या 11 बोटी

shivrajya patra

पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावला  मिळणार आणखी गती

दारफळ येथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आर्मी शी संपर्क ; एअरलिफ्ट ची व्यवस्था 

माढा येथे एनडीआरएफचे एक बचाव पथक कार्यरत होते, जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करून दुसरे बचाव पथक मिळवले, ते दोन तासात माढा येथे पोहोचणार

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकलेले असून अतिरिक्त बचाव पथके मागवून बचाव कार्य होईल अधिक गतिमान 

सोलापूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस व अतिवृष्टी होत आहे. तसेच उजनी धरणातून भीमा नदीत तसेच सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात असल्याने माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत. अतिरिक्त बचाव पथके आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल रात्रीपासून अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून 11 बोटी पुरेशा मनुष्यबळासह उपलब्ध करून घेतल्या असल्याचं सांगण्यात आलंय.

              (माढा तालुक्यातील दारफळ येथील छायाचित्र )

जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु अतिरिक्त बचाव पथके आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल रात्रीपासून अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून अकरा बोटी पुरेशा मनुष्यबळासह उपलब्ध करून घेतल्या असून त्या आज दुपारपर्यंत घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्याला अधिक गती मिळणार आहे. यामध्ये कोल्हापुर 3, लातूर 1, सांगली 3, इंदापूर 2, नांदेड 2 अशा 11 बोटी मागवण्यात आलेल्या आहेत.

                                     (मोहोळ तालुक्यातील बचावकार्याचं छायाचित्र)

त्याप्रमाणेच माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून एनडीआरएफ टीमचे पथक बचावासाठी गेले होते परंतु पुराच्या पाण्याचा प्रवाह खूप गतीने येत असल्याने त्यांना त्या नागरिकांना सुखरूप ठिकाणी बाहेर काढणे शक्य झालेले नव्हते, त्यामुळे सैन्य दलाची चर्चा करून जिल्हा प्रशासनाने त्या नागरिकांना एअरलिफ्टद्वारे सुखरूप ठिकाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लवकरच आर्मीचे हेलिकॉप्टर पथक दारफळ येथे पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही करतील.

महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी एनडीआरएफचे आणखी एक पथक बचाव कार्यासाठी मिळवले असून ते पुढील दोन तासात माढा येथील बचाव कार्यात सहभाग घेणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

(मोहोळ तालुक्यातील एकुरके गावातील परिस्थिती)

संपूर्ण सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणा ही महापूराची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. तरी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 0217/2731012 या  क्रमांक वर संपर्क साधून अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 0217/2731012 या  क्रमांकावर संपर्क साधून  द्यावी अतिवृष्टी-पूर परिस्थितीची माहिती 

***

दारफळ सीना तालुका माढा येथील बचाव कार्य व पूर परिस्थितीचे फोटो


आर्मीच्या हेलिकॉप्टरने माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या आठ नागरिकांना एयरलिफ्टिंग द्वारे बाहेर काढण्यात आलेले आहे तर आणखी जवळपास 20 नागरिक अडकलेले असून त्यांनाही सुखरूपपणे बाहेर काढण्याची प्रयत्न सुरू आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्यातील दारफळ सीना येथील अतिवृष्टी व पूर परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला.

मोहोळ तालुक्यातील घाटणे कारंडे वस्ती येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबीयांना मोहोळचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखालील मोहोळ पोलीस ठाण्याच्या रेस्क्यू टिम ने सुखरूप सुरक्षित ठिकाणी हलवले.

सीना नदीवर असलेल्या दोन्ही रेल्वे पुलाखालील पाण्यानं थोक्याच्या पातळीला स्पर्श केलाय. त्याचं एक छायाचित्र



To Top