सोलापूर : अक्कलकोट कृषि उत्पन्न बाजार समितीतील तत्कालिन लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे (वय- 55 वर्षे) आणि त्याचा साथीदार विनायक अंबादास जाधव (वय-29 वर्षे) यांच्यावरील लाचखोरीचा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी प्रत्येकी 03 वर्षे सक्तजुरी आणि 05 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, कृषी उत्पन्न बाजार समितीतील लेखापाल राजशेखर मुळे यांनी, एका शेतकऱ्याला, तुझी 31 पाकीटे तूर खराब असल्याने ती पाकिटे वखार महामंडाळाकडे जमा करुन घेण्यासाठी प्रत्येकी 100 रुपयांप्रमाणे 3,100 रुपये इतक्या लाचेची मागणी केली. 
लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्या शेतकऱ्याने सोलापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात रितसर लेखी तकार नोंदविली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, सोलापूर यांनी कायदेशीर पडताळणी केली. त्यामध्ये लेखापाल राजशेखर मुळे याने तडजोडीअंती 2,500 रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पडताळणीनंतर आरोपीविरुध्द सापळा रचण्याचा निर्णय घेतला. 
त्याप्रमाणे आरोपीविरुध्द सापळा कारवाईमध्ये लेखापाल मुळे याने तक्रारदार शेतकऱ्याकडे लाचेची मागणी करुन, ती लाच रक्कम विनायक जाधव याच्याकडे देण्यासंदर्भात सुचविले. तक्रारदाराने दिलेली 2,500 रुपये लाच विनायक जाधव याने लेखापाल राजशेखर मुळे याच्या सांगण्यावरून स्विकारली. हा प्रकार 29 मार्च 2018 रोजी घडला.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, सोलापूर यांनी तपासाअंती आरोपी क्रमांक 01 लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे आणि आरोपी क्रमांक 02 त्याचा साथीदार विनायक अंबादास जाधव यांच्याविरुध्द आरोपी राजशेखर मुळे यांने लोकसेवक या पदाचा दुरुपयोग करुन वैध्यपरिश्रमीकाखेरीज अन्य परितोषण म्हणून आरोपी क्रमांक 02 विनायक जाधव याच्याहस्ते तक्रारदाराकडून 2,500 रुपये लाचेची रक्कम स्विकारून सांपत्तिक फायदा मिळवून गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केल्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणामध्ये सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सौ. शीतल डोके यांनी न्यायालयात या केसमध्ये 03 साक्षीदार तपासले. त्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
यामध्ये सरकार पक्षातर्फे सादर केलेला युक्तीवाद व विविध सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे विचारात घेऊन न्यायालय जिल्हा न्यायाधीश (02) योगेश राणे यांनी आरोप सिद्ध दोषी राजशेखर श्रीमंत मुळे (आदर्शनगर, अक्कलकोट) याला ला. प्र. अधिनियम 1988 चे कलम 12 नुसार प्रत्येकी 03 वर्षे सक्तमजुरी आणि 05 हजार रुपये इतका दंड व दंड न दिल्यास 01 महिना साधी कैदेची शिक्षा तसेच आरोपी विनायक अंबादास जाधव (रा. किणी, ता. अक्कलकोट) याला कलम 07 अ अन्वये 03 वर्षे सक्त मजुरी व 05 हजार रुपये इतका दंड व दंड न दिल्यास 01 महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.
यामध्ये तपासी अधिकारी म्हणून जगदीश भोपळे यांनी व कोर्ट पैरवी म्हणून श्रीमती गायकवाड यांनी काम पाहिले. या खटल्यात आरोपीतर्फे एडवोकेट सुरेश पाटील यांनी बाजू मांडली.
