उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या कुरेशीला दिला 01 लाखाचा दंड; ... अन्यथा जमीन महसूल कायद्यान्वये होणार वसुली

shivrajya patra

सोलापूर : याचिका दाखल करताना वस्तुस्थिती लपवून उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी इब्राहीम खाजासाब कुरेशी यांना 01 लाख रुपयांचा दंड करण्यात आला. कुरेशी यांची रिट पिटीशन फेटाळल्यावर दंडाची रक्कम पिटीशनर कुरेशी यांनी एक महिन्याच्या आत भरण्याचे निर्देश दिले.

येथील शास्त्रीनगर अन्सारी चौकातील रहिवासी इब्राहीम खाजासाब कुरेशी (वय-52वर्षे) याच्याविरुध्द सन 2009, 2015, 2016, 2018, 2021 आणि 2025 या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा-मारामारी करणे, जनावरांना क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक, जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणे यासह अन्य कलमाखाली गुन्हे दाखल होते. 

त्याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता. त्याची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-01 यांना देण्यात आली होती. 

सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-01 यांनी इब्राहिम कुरेशी यांना त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने महा.पो.का.क. 59 अन्वये नोटीस दिलेली होती. त्यावर इब्राहिम खाजासाब कुरेशी यांनी वरील नोटीसविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात येथे 3571/2025 अन्वये रिट पिटीशन दाखल केले होते.

उच्च न्यायालयानं 30 जुलै रोजी रिट पिटीशनमध्ये रिट पिटीशन दाखल करणारे इब्राहीम कुरेशी यांनी याचिका दाखल करताना वस्तुस्थिती लपवून उच्च न्यायालयाची दिशाभूल केली. आणि न्यायालयाच्या अमुल्य वेळेचा अपव्यय केल्याचे अधोरेखित करताना, कुरेशी याला 01 लाख रुपयांचा दंड केला.

हा दंड मुदतीत न भरल्यास जिल्हाधिकारी हे महाराष्ट्र जमिन महसूल कायद्यान्वये कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल करतील, असंही न्यायालयाच्या आदेशात नमूद असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडील वाचक शाखेने एका प्रसिद्धी पत्रकात  म्हटलं आहे.

To Top