मोबाईलवर येणाऱ्या धमकीवजा कॉलसंबंधी बाळगावी सावधानता; २९ लाख रुपयांहून अधिकची फसवणूक

shivrajya patra

सोलापूर : मोबाईलवर येणाऱ्या धमकीवजा कॉलसंबंधी सावधानता बाळगण्याची असलेली गरज या 02 घटनांनी ऐरणीवर आणलीय. अज्ञातांनी अटकेची भिती घालून एका महिलेसह दोघांची जवळपास २९ लाख रुपयांहून अधिकची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार माहे जून ते ऑगस्टदरम्यान वेळोवेळी घडला. याप्रकरणी दाखल झालेल्या वेगवेगळ्या तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाण्याकडं अज्ञातांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

पहिल्या घटनेत, तुमच्या विरोधात कुलाबा पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल असल्याचे सांगून भवानी पेठेतील रहिवासी महिलेस भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करून वैयक्तिक माहिती विचारून तुमचे आधार कार्ड व एटीएम कार्ड कुलाबा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मनी लाँडरींग गुन्ह्यातील आरोपी नरेश गोयल याचे घरामध्ये सापडले असल्याचे सांगण्यात आले.

नरेश गोयल यास मनी लाँड्रींग गुन्हयामध्ये सीबीआयकडून अटक केली आहे, व तपासामध्ये तुमच्या नावे असलेल्या कॅनरा बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक उलाढाल झाली असून, सदर प्रकरणामध्ये आपला ही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी खोटी माहिती सांगून फिर्यादीचे नावे अरेस्ट वॉरंट सुप्रीम कोर्टाची नोटीस व सर्व्हेलन्सचे ३ पानी इंग्रजी मध्ये नियम असलेली नोटीस त्या महिलेस व्हॉटसअपवर पाठवून दिली.

त्या भितीच्या आडून त्या महिलेकडून वेळोवेळी २१,२५,१६१ रुपये इतकी रक्कम त्यांनी दिलेल्या वेगवेगळया बँक खात्यामध्ये आरटीजीएस द्वारे व फोन पे द्वारे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून तिची  ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणात तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सायबर पोलीस ठाण्यात मोबाईल क्रं. +९११४०९३०९०६८ चा धारक, +९१७२०७८८८५९८ अनोळखी विजय खन्ना (पोलीस सब इन्स्पेक्टर कुलाबा पोलीस स्टेशन),+९१९१४६९७९२८९ प्रविण सुद (सीबीआय ऑफिसर) तसेच वेगवेगळ्या बँकेचे बँक खातेदार या आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दुसऱ्या घटनेत, अज्ञातांनी होटगी रस्त्यावरील रहिवासी ज्येष्ठ नागरिकास भ्रमण ध्वनीवर कॉल करून प्रारंभी पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर गैरप्रकार तसेच मनी लॉन्ड्रींग आणि फौजदारीयुक्त गुन्हा याबाबत धमकीची भाषा वापरुन त्यातून सुटका होण्यासाठी ८ लाख रुपये इतकी रक्कम प्राप्त करुन घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. 

तत्पूर्वी त्यांना चुकीच्या पध्दतीने अटकाव करुन, निवासस्थानी बंदीस्त ठेवले, तसेच अनेकदा नोटीस खोटे दस्त तयार केले आणि ते बनावट दस्त खरा असल्याचे भासवत त्यांची फसवणूक करण्यासाठी ही वेगळी पध्दत वापरली असल्याचं आर्थिकदृष्ट्या फसलेल्या नागरिकानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार मोबाईल क्रं. ८५४४३८०२०१, ७७४९९६७१९६ चा धारक व इतरांविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक गजा या गुन्ह्यांचा अधिक तपास करीत आहेत.

To Top