शांतता कमिटीचे अध्यक्ष, सदस्य यांची नियोजन भवन येथे पार पडली बैठक
सोलापूर : कर्णकर्कश डीजेमुळे लहान मुलांना-वृध्दांना धोका आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होते. तरी प्रत्येक शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळ व गावकऱ्यांनी डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रह धरला पाहीजे, असं आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शांतता कमिटीचे अध्यक्ष, सदस्य यांची बैठक आयोजित केली होती. ही बैठक नियोजन भवन येथील सभागृहात पार पडली. गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो, याचा ताण पोलिस विभागावर येतो, यामुळे उत्सवात नागरिकांचं आचरण कसं असावं, गणेश मंडळांनी कशा प्रकारे उत्सव साजरा करावा, यासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक कुलकर्णी बोलत होते.
या बैठकीस ग्रामीणच्या सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, मोहल्ला समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे अध्यक्ष, गणेश मुर्ती विक्रेते, डीजे चालक उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक म्हणाले की, गणेशोत्सव सर्व सामान्यांचा सार्वजनिक उत्सव आहे, हा उत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांनी समाज हिताचे उपक्रम राबविण्यावर भर दिला पाहीजे. गावामध्ये सीसीटीव्ही, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आयोजित केलं पाहीजे. तसेच डीजे मुक्तीचा देखील निर्धार केला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी यावेळी केलं.
यावर सर्व उपस्थितांनी डीजे मुक्त उत्सव करण्याचं आश्वासन दिले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, पोलिस उपअधीक्षक शिरीष हुंबे, पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
