सर्जा-राजाचा पोळा उत्तर, दक्षिण सोलापूरसह मराठवाड्यात सर्वत्र उत्साहात साजरा

shivrajya patra

सोलापूर/22 ऑगस्ट: 

ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता बळीराजाबरोबर खांद्याला खांदा लावून सालभर शेती करणार्‍या सर्जा-राजाचा पोळा सण. या दिवशी बळीराजाच्या मालकीनेने त्यांची पूजा करून पाची पक्वान्नाने बैलजोडीसह घरातील जनावरांना भरविले. दरम्यान, हा पोळा सण उत्तर, दक्षिण सोलापूरसह मराठवाड्यात सर्वत्र अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. 

या सणाच्या पूर्वसंध्येलाच बैलांना स्वच्छ धुवून खांदेमळणी करण्यात आली. आज दिवसभर या बैलांच्या खांद्यावर शिवळही दिले नाही. वर्षभर शेतात राबून त्यांच्या खांद्याला घट्टे पडलेले असतात म्हणून पोळ्याच्या पूर्वसंध्येला खांदेमळणी केली जाते. पोळ्यादिवशी या बैलांच्या शिंगांना बेगड लावली जातात आणि त्यांच्या अंगावरही विविध रंगाने रंगविले जाते. इतकेच नाहीतर दुपारी त्यांची पूजा करून मिरवणूकही काढली जाते. 

काही ठिकाणी हलगी, बँड वाजवून त्यांना मिरविले जाते तर काही भागात चक्क डॉल्बी लावून मिरविले जाते. शेतीमध्ये बैल हे शेतकर्‍याचे मुख्य साथीदार असतात. नांगरणी, पेरणी, वाहतूक यासाठी बैलांचा उपयोग होतो. त्यांचे परिश्रम मान्य करून, त्यांना मान देण्यासाठी पोळा साजरा केला जातो.

......

बैलांप्रती प्रेम अन् जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस 

बैल पोळा हा सण शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी श्रावण महिना समाप्त होतो. वर्षभर शेतामध्ये काम करणार्‍या बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण भारतामध्ये विविध भागामध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा आणि काही दक्षिणेकडील भागात साजरा होतो.

.....

बैलांप्रती कृतज्ञतेचा सण 

जसे आपण दिवाळीला घर-देवता, होळीला अग्नी, तसा पोळा हा बैलांसाठी असतो. शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतो. या दिवशी बैलांना स्नान घालतात, त्यांना तेल लावतात, शिंगांना रंगवतात, झगमगते हार-फुले, गळ्यात माळ घालतात. पाठीवर झुली घालून त्यांना गोड खाऊ घालतात. इतकेच नाहीतर बैलांची पूजा करून शेतकरी समृद्ध पिकं, चांगले आरोग्य आणि कष्टाची योग्य फळे मिळावीत यासाठी प्रार्थना करतो.

......

बैलांसाठी विश्रांतीचा दिवस

या दिवशी बैलांना स्वच्छ धुवून बैलांच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावून, हार-फुले, माळा घालतात. त्यांना अगरबत्ती लावून ओवाळणी करून गोड पदार्थ खाऊ घालतात. या दिवशी बैलांना शेतात कामाला जुंपत नाहीत. वर्षभर राबणार्‍या बैलांना या दिवशी आराम देण्यात येतो. त्यांना सजवून त्यांची पूजा केली जाते. तसेच खास पारंपरिक मेजवानीचा बेत आखला जातो.

To Top