दक्षिण सोलापूर : तालुक्यातील इंगळगी, कणबस आणि शिरवळ परिसरात असलेल्या शिरवळ धुबधुबी प्रकल्पामध्ये गेल्या महिनाभरापासून उजनीचे पाणी सोडण्यात आले. त्या पाण्यानं धुबधुबी शंभर टक्के भरून ओव्हर फुल झालं आहे. सोमवारी सायंकाळी धुबधुबी सांडव्याच्या ठिकाणी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
सुमारे 25 वर्षांपूर्वी शिरवळ धुबधुबी प्रकल्प साकारला. यासाठी 400 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाच्या पाण्यावर केवळ चार-पाच वेळा तलाव भरले. आजूबाजूच्या पाच- सहा गावांसाठी सदरील प्रकल्प खूप महत्वपूर्ण असून या गावांचा पाणीपुरवठा देखील या प्रकल्पावरच आहे. त्यामुळे शेतकरी बांधव तसेच नागरिकांची धुबधुबी भरून देण्याची मोठी मागणी होती. 
त्यानुसार आमदार सुभाष देशमुख यांनी तलाव पूर्ण भरून देण्यासाठी जून महिन्यापासूनच प्रयत्न सुरू केले. त्यानुसार रामपूर व हणमगांव तलाव भरले. हणमगांव तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर सदरील पाणी शिरवळ तलावात पोहोचले. त्यानुसार शिरवळ धुबधुबी भरून ओव्हर फ्लो झाले आहे. 
आता येथील शेतकऱ्यांना पाण्याची चिंता करू नये. आपण या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले. उजनीचे पाणी धुबधुबीमध्ये सोडल्याने राजशेखर शिवदारे व मल्लिकार्जुन पाटील यांनी आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानले.
जलपूजन प्रसंगी शिरवळ मठाचे सोमनिंग महाराज, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, बाजार समितीचे संचालक रामप्पा चिवडशेट्टी, हनुमंत कुलकर्णी, यतीन शहा, शिरवळचे सरपंच शरणाप्पा गोडनवरू, इंगळगीचे सरपंच विनोद बनसोडे, सोसायटीचे चेअरमन शिलीशिद्ध कोटे, काशिनाथ तदेवाडी, शिरवळचे उपसरपंच बसवराज पाटील, बिलेणी पुजारी, इंगळगीचे राहुल वंजारे, सागर धुळवे, प्रशांत पाटील, प्रधान गुरव, मारुती रणखांबे, जगदीश दसाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
