सोलापूर : अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळून आपल्या गावी जाण्यासाठी प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या विद्यार्थिनीची चांदीचे दागीने अन् वापरते कपडे असलेली बॅग रिक्षात विसरली. ती बॅग शोधण्याच्या कामात गुन्हे शाखेकडील पोलीस कर्मचाऱ्यांनी, त्या रिक्षाचा शोध घेऊन गहाळ झालेली बॅग शोधून देण्यात मोलाची कामगिरी बजावली.
शुक्रवारी दुपारी 12:00 वा. च्या सुमारास सोलापुरातील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची एक विद्यार्थीनी तिच्या गावी, अहिल्यानगर येथे जाण्याकरिता अशोक चौक ते सोलापूर एस.टी. स्टँड मार्गावरील एका ऑटो रिक्षामध्ये बसली. ती इच्छित स्थळी उतरल्यानंतर तिची एक बॅग ऑटोरिक्षातच विसरल्याचं दिसून आलं.
त्या बॅगमध्ये त्या विद्यार्थिनीचे चांदीचे दागीने व कपडे होते. ही बाब लक्षात आल्यानंतर ती विद्यार्थिनी सीसीटीव्ही कक्ष मनपा येथे आली असता, गुन्हे शाखेकडील अंमलदारांनी अशोक चौक ते एस.टी. स्टँड दरम्यान असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून संबंधित ऑटो रिक्षाचा क्रमांक निष्पन्न करून त्या रिक्षा चालकास संपर्क साधून ऑटो रिक्षात विसरलेली बॅग ताब्यात घेतली. ती बॅग त्या विद्यार्थीनीस परत मिळाल्यानं तिनं सर्वांचं आभार व्यक्त केलं.
ही कामगिरी गुन्हे शाखेकडील पोह/668 पटेल, पोह/ 450 बर्डे, पोकॉ/1670 करण माने (सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष) यांनी केली.
