सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नक्कीच राज्य शासन सकारात्मक विचार करीत आहे. काही तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून आम्हाला या विषयावर अधिक बोलता येत नाही, असे राज्याचे कॅबिनेट उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणणे मांडल्याचं सांगण्यात आलंय.
कॅबिनेट उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता, ते राज्याच्या संवैधानिक पदावर असताना मराठा आरक्षणाबाबत नकारात्मक भूमिका घेत आहेत आणि विरोधात वेगवेगळे स्टेटमेंट देत आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळातले काही मंत्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर बेछूट आरोप व टीका करीत आहेत. अशा मंत्र्यांना समज देण्यात यावी आणि सरसकट 50 टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली. 
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, मोहन डोंगरे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर दौऱ्यावर असताना, त्यांच्या मराठा आरक्षणाच्या चुकीच्या विधानाबाबत संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे वतीने जाब विचारण्याचा प्रयत्न होता, तत्पूर्वी फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पार्क चौकात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हा वकील आघाडीचे गणेश कदम, शहर उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, यांची आमदार देवेंद्र कोठे यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात भेट घालून दिली.
मंत्री या नात्याने मराठा समाजाच्या भावना दुखावतील, असं वक्तव्य करू नये. मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही. सर्वसामान्य मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये तेही हक्काच्या ओबीसी प्रवर्गात 50 टक्के मध्येच आरक्षण मिळणे गरजेचे आहे. याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा अशी भावना आंदोलकांनी यावेळी मांडली. त्यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासन सकारात्मक विचार करीत आहे. काही तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून आम्हाला या क्षणी या विषयावर अधिक बोलता येत नाही, असं म्हटल्याचं कदम यांनी सांगितले.
