नाट्यपरिषद करंडक प्राथमिक फेरीला प्रारंभ
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई यांच्या वतीने "नाट्य परिषद करंडक २०२५"या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सोलापूर केंद्रावर दमदार सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटक व नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी नाट्य परिषदेचा हा उपक्रम अत्यंत अभूतपूर्व असून, नाट्य विषयक चळवळ तरुणांपर्यंत पोहोचली आणि रुजली पाहिजे, यासाठी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या कल्पक नेतृत्वातून होत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
महाराष्ट्रातून या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळालेला असून राज्यातून सर्व केंद्र मिळून एकूण २५२ संघांनी या एकांकिका स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे, अशी माहिती देत राज्य पातळीवर होत असलेल्या या स्पर्धेतून नाट्यसृष्टीस निश्चितच नवोदित कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक मिळतील, असा आशावादही प्रकाश यलगुलवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी व्यासपीठावर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, जयप्रकाश कुलकर्णी, नाट्यपरिषद मुंबई शाखेच्या कार्यकारिणीचे सदस्य व सोलापूर उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजयकुमार साळुंखे, मध्यवर्ती कार्यकारिणीचे सहकार्यवाह दिलीप कोरके, नियामक मंडळ सदस्य तेजस्विनी कदम, महानगर शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अजय दासरी, बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा सोलापूरचे अध्यक्ष सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार, नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य व केंद्रप्रमुख सुमित फुलमामडी, मंगळवेढा शाखेचे प्रमुख कार्यवाह यतीराज वाकळे व स्पर्धेचे परीक्षक विश्वास धुमाळ- मुंबई, प्रताप सोनाळे-सांगली, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्रायोगिक रंगभूमी परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष जयप्रकाश कुलकर्णी यांनी नाट्य चळवळीचे विविध प्रवाह कार्यान्वित आहेत, पण सर्वांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे यातून नवोदित कलावंत घडला पाहिजे आणि यासाठी नाट्य परिषद घेत असलेल्या या स्पर्धेचे त्यांनी स्वागत केले.
याप्रसंगी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे कार्यकारणी सदस्य व सोलापूर उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांच्या आयोजनामागे नवोदित कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून देणे व त्यांना योग्य प्रोत्साहन देणे हा असून त्यासाठी नाट्य परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले.
प्राथमिक फेरीसाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण १४ संघांनी सहभाग नोंदवला आहे. आज "प्रेम की यातना", "खिच्याक" "चफी" " बेगम" "जाहला सोहळा अनुपम" तसेच सोहम थिएटर,हैदराबाद- या संस्थेची "काय झालं,बाळ रडत होतं?" ही एकांकिका सादर झाली.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर स्पर्धेचे समन्वयक प्रा. जोतिबा काटे, इम्तियाज मालदार, संजय सावंत नाट्य परिषदेचे जेष्ठ कार्यकारणी सदस्य पद्माकर कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी व्यंकटेश रंगम, ज्येष्ठ रंगकर्मी राजा राजेशचंद्र, ज्येष्ठ रंगकर्मी राजेश जाधव, श्रुती मोहोळकर, शोभा बोल्ली आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय नाट्य परिषद सोलापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह प्रा. जोतिबा काटे यांनी केले तर नियामक मंडळ सदस्य व केंद्रप्रमुख सुमित फुलमामडी यांनी आभार मानले.
