सोलापूर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभारी गांव हद्दीतील नवीन विडी घरकुल येथे बोगस डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा काळा धंदा करीत आहेत. या बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलं होतं. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे यशवंत पवार यांनी सांगितले.
नवीन विडी घरकुल परिसरात कोणतेही वैद्यकीय शिक्षण वा वैद्यकीय ज्ञान नसलेले बोगस डॉक्टर बिनदिक्कीतपणे स्वयंघोषित डॉक्टर बनून रुग्णावर उपचार करीत आहेत. हे बोगस डॉक्टर वा 'अर्धवट' रावांमुळे नवीन विडी घरकुलमधील सामान्य नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवीन विडी घरकुल भागातील कष्टकरी-कामगार व गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी त्या डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे अशा बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
हा डॉक्टर बोगस असल्याचे सर्वसामान्य रुग्णांना देखील कळत नाही. शिवाय रुग्ण देखील अशा बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षणाबाबत अधिक चौकशी करत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत. घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु आहे.
वैद्यकीय परवाना व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होण्याच्या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक यशवंत पवार यांनी सोमवारी, 04 ऑगस्टपासून जिल्हा परिषद समोर पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलं होते. हा परिसर बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, यासाठी पवार आग्रही होते.
या बेमुदत धरणे आंदोलनाची गंभीर दखल घेऊन नवीन विडी घरकुल परिसरातील डॉक्टरांच्या शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे तपासणी करून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे लेखी पत्र मिळाल्याने यशवंत पवार यांनी त्यांचं बेमुदत आंदोलन स्थगित केलं.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शेगर, दक्षिण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलम घोगरे, बसवराज बिराजदार, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, पत्रकार अमोल कुलकर्णींसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
