स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संचार ब्यूरो आणि मध्य रेल्वे सोलापूर यांचा विशेष उपक्रम
प्रदर्शन सर्वांसाठी दोन दिवस खुले राहणार
सोलापूर : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर व मध्य रेल्वे विभाग, सोलापूर यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, ऐतिहासिक स्थळे, राष्ट्र ध्वजाचा इतिहास, ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक १४ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सोलापुर रेल्वे स्टेशनच्या अनारक्षित तिकीट खिडकी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ सुजीत मिश्रा यांच्या हस्ते १४ ऑगस्ट, रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे. 
यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशूमाली कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, भारतीय सैन्य दलातील अधिकारी आणि रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे. याप्रसंगी वीर माता, वीर पत्नी, निवृत्त माजी सैनिक यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनामध्ये १८५७ ते १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना, ऐतिहासिक स्थळे, राष्ट्र ध्वजाचा इतिहास, सोलापुरातील चार हुतात्मे, सेल्फी बूथ, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे व मजकूरासहित माहिती नागरिकांना बघता येणार आहे.
जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 
जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी व युवकांनी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आलं आहे.
