भटके विमुक्त समाजाचा इतिहास अन्याय, दडपशाही आणि संघर्षाचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळात 1871 साली लागू झालेल्या गुन्हेगार जमाती कायद्याने हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. या कायद्यानुसार समाजाला जन्मतःच गुन्हेगार ठरवण्यात आले. कुठे राहावे. कुठे काम करावे, यावर कठोर निर्बंध होते. वस्तीवर पोलीस नजर ठेऊन होते, शिक्षण व रोजगारापासून समाज वंचित राहिला, हा कायदा भटक्या समाजासाठी गुलामगिरीपेक्षा भयानक ठरला.
भारतीय स्वातंत्र्यानंतर 1952 साली या अन्यायकारक कायद्याचा अंत झाला. 31 ऑगस्ट रोजी 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द झाला आणि समाजाला 'विमुक्त' घोषित करण्यात आले. मुंबई प्रांतातील सोलापुरातील सेटलमेंट च्या तारेचं कुंपण तोडून समाजाला मुक्त करण्याच्या कार्यात तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचे हात लागले होते, हा इतिहास आहे.
या ऐतिहासीक घटनेने समाजाला नवी ओळख, नवे अस्तित्व दिले. त्यामुळेच 31 ऑगस्ट हा दिवस आपल्या सन्मानाचा, आत्मसन्मानाचा आणि संघर्षांचा प्रतीक दिवस ठरतो. भटक्या समाजाच्या इतिहासाची जाणीव, वर्तमानातील लढाई आणि भविष्यातील अशा या तीन गोष्टींना जोडणारा दिवस म्हणजे 31 ऑगस्ट-विमुक्त दिन होय.
भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रच्या सलग तीन वर्षांच्या पाठपुराव्याची राज्य शासनाने दखल घेत 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिन करण्याचे घोषित केले.
भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती चे निमंत्रक यशवंत फडतरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर अन् जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातून आलेले भटके विमुक्त रविवारी सकाळी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आले होते. भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भटके विमुक्त आदिवासींच्या सांस्कृतिक रॅलीस प्रारंभ झाला.
ही सांस्कृतिक रॅली पार्क चौक, श्री सिध्देश्वर मंदिर, मार्केट पोलीस चौकीमार्गे जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचली. पत्रकार कृती समिती आणि अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवाराच्यावतीने भटक्या विमुक्त आदिवासी सांस्कृतिक रॅलीला पाठिंबा देण्यात आला, तत्पूर्वी सांस्कृतिक रॅली समारोपाच्या स्थळी पालावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नागरिकत्वाचे विविध पुरावे गृह चौकशीच्या आधारे द्या, भटके विमुक्त समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय व मंत्री असावे, अतिक्रमित जमिनीचे नियमितीकरण करुन भूमिहीनांना जमिन द्यावी आणि रूढीग्रस्त भटके-विमुक्त समाज भिक्षेकरीसाठी स्थलांतरीत होत आहे, म्हणून त्यांना शासनाने ओळखपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी राज्य शासनाकडं आग्रह राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
या रॅलीत भटक्या-विमुक्त आदिवासी समुहातील पुरुष, महिला लहान- मुलांसह रुढी-परंपरेच्या भारासह सहभागी झाल्या होत्या. यावेळी मल्लेश सूर्यवंशी, भारत जाधव, मनोहर गायकवाड, विजय शिंदे, मारुती मरिआईवाले, विक्रम जाधव, रोहिणी गायकवाड, सुषमा कांबळे, रशीद निंबाळकर, मिलिंद प्रक्षाळे, बाशा शेख, सुनिता मरिआईवाले, अप्पाराव राठोड आदिवासी पारधी क्रांती कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र अध्यक्ष नेताजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष योगेश काळे आणि यल्लव्वा तेली याची प्रमुख उपस्थिती होती.


