अक्कलकोट : शिव, फुले, शाहू-आंबेडकरांच्या संविधानवादी मूल्यांना गाव खेड्यापर्यंत पोहोचवून, विषमतावादी आणि संविधानविरोधी शक्तींना 'सळो की पळो' करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी, १८ फेब्रुवारी रोजी सर्व पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांनी अक्कलकोट बंदची हाक दिलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स/युथ असोसिएशन हा बंद यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे सहभागी होणार आहे. सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट येथील शेकडो कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभागी व्हासं, असं आवाहन संस्थापक अध्यक्ष उत्तम नवघरे यांनी संघटनेच्या वतीने केलं आहे.
स्थापनेपासूनच आरएसएसने संविधानास विरोध करून मानवी मूल्यांनाच विरोध केला आणि जेव्हा जेव्हा परिवर्तनवादी विचारवंत, कार्यकर्ते त्यांच्यासमोर आव्हान उभे करतात, तेव्हा-तेव्हा त्या विचारधारेने महात्मा गांधींचा खूनानंतर तीच परंपरा चालू ठेवत, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या.
अशाच पद्धतीने ज्ञानेश महाराव यांचा देखील आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तरीसुद्धा पुरोगामी आवाज त्यांना बंद करता आला नाही. यामुळे भयभीत झालेल्या संघ परिवाराच्या प्रवृत्तींकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करून पुन्हा एकदा समतेचा आवाज दाबता येतो का ही चाचणी घेतली आहे.
अशा भ्याड कृत्याला न घाबरता त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी या बंदची हाक देण्यात आलीय. सर्व समतावादी, बहुजनवादी, पुरोगामी, संविधानवादी, व्यक्ती, पक्ष-संघटनांनी यामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.