सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दक्षतेचा उपाय म्हणून संभाजी ब्रिगेड आणि समविचारी कार्यकर्त्यांची गुरुवारी पहाटेपासून धरपकड सुरू करण्यात आल्याचं दिसतंय. कोथाळे येथील महेश पवार यांच्या शेतातील घरासमोर पोलीस बंदोबस्त असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मोहोळ तालुक्यातील कोथाळे येथील महेश दामोधर पवार यांच्या शेतातील घरासमोर कामती पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल झाला असून, सोलापूर पोलीस आणि राज्याच्या गृह विभागाने अशी सतर्कता वेळीच दाखवली असती तर अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासंबंधीचा अनुचित प्रकार घडलाच नसता, असं महेश पवार यांनी म्हटलंय.
सकल मराठा समाज असल्या कारवाईला घाबरत नसतो, असं महेश पवार यांनी म्हटलं असून या कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचा आणि सरकारचा जाहीर निषेध केला आहे. मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचे खंदे समर्थक अशी महेश पवार समाजमनात ओळख आहे. ग्रामीण पोलिसांनी महेश पवार यांना ताब्यात घेतल्यावर कामती पोलीस ठाण्यात आणल्याचं वृत्त आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालिन सरसंघचालक कुप्पाहल्ली सीतारामय्या सुदर्शन उपाख्य के. सुदर्शन यांच्याविरुद्ध शिवस्मारकमध्ये झालेल्या निषेध आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी निषेध आंदोलने होत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्यात ताब्यात घेऊन बसवण्यात आले आहे.
संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शिरीष जगदाळे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, शेखर जगदाळे, सोमनाथ राऊत, सोहन लोंढे, महेश सावंत, मारुती सावंत यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलीस स्टेशन, फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सदर बझार पोलीस ठाणे आणि जोडभावी पोलीस स्टेशन यांनी ताब्यात घेतलं आहे.