कासेगाव/प्रतिनिधी : येथील भगवान धर्माण्णा चौगुले यांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले. स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना सोलापूर यांच्या वतीने भगवान चौगुले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पोलीस अधिकारी राणी झांबरे, धनश्री उत्पात, उमेश काशीकर, चंद्रकांत वेदपाठक, विनोद भोसले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गौरवपत्र अन् मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील भगवान धर्माण्णा चौगुले यांचे 'मोरपीस' व 'जय हो' हे दोन कविता संग्रह यापूर्वीच प्रकाशित झाले आहेत. धाराशिव आकाशवाणीवर काव्य वाचन आणि अनेक वर्तमानपत्रात कविता प्रसिद्ध झाल्या आहेत, तसेच अनेक बालनाट्य प्रकाशित झाले. सादरीकरण आणि पारितोषिके यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक विकास झाला, याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव शेटे यांनी केले.
या यशाबद्दल जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सच्चिदानंद बांगर, श्री स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळाच्या सचिवा लक्ष्मीबाई इटकर, अशोक उमाप, बालाजी लोमटे, श्रीनिवास इटकर, शकील शेख, बसवराज करपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.