सोलापूर : बाळंतपणातील उपचारास विलंब तसेच उपचारातील निष्काळजीपणामुळे महिला रुग्णासह तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना १८ मे रोजी ०९.३० वा ते १९ मे २०२२ रोजी २१.४५ वा चे दरम्यान, गोलचावडी दवाखाना मंगळवार बाजार, ते सिव्हील हॉस्पीटल येथे घडली. सौ. समीना हारुन बागवान (वय-१९ वर्षे) मृत रुग्णाचं नांव आहे. तिच्या मृत्यूप्रकरणी ०३ वर्षानंतर दाखल झालेल्या तक्रारीनुसार, तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. सुनिता देगांवकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शेळगी परिसर मित्र नगर जवाहर नगरातील रहिवासी हारुन नजीर बागवान यांची पत्नी सौ. समीना हिची नॉर्मल डिलीव्हरी करुन देण्याचे सांगून डॉ. सुनिता देगांवकर यांनी तिला डिलीव्हरीकरिता मंगळवार बझार नजिकच्या महानगरपालिकेच्या गोलचावडी रुग्णालयात अॅडमीट करुन घेतले.
तिच्यावर १८ मे २०२२ रोजी दिवसभर काही एक उपचार न करता तिची प्रकृती चिंताजनक झाल्यावर रात्रीच्या सुमारास तिला सिव्हील हॉस्पीटलला उपचाराकरीता घेऊन जाण्याबाबत सांगितल्याने डॉ. सुनिता देगावकर यांच्या उपचारातील विलंब आणि निष्काळजीपणा या कारणामुळे सौ. समीना आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची फिर्याद मृताचा पती हारुन बागवान यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल केली.
या घटनेला ०३ वर्षांहून अधिक कालावधी लोटल्यावर आलेल्या फिर्यादीनुसार जोडभावी पेठ पोलिसांनी आरोपी डॉ. सुनिता देगावकर यांच्याविरुध्द भा.द.वि. ३०४ (अ) प्रमाणे ०९ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मपोनि शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
