'शिक्षण वाचवा-विद्यार्थी वाचवा' या घोषणेसह सोमवारी छत्रपती संभाजीनगरात राज्यव्यापी विद्यार्थी महारॅलीचे आयोजन

shivrajya patra

भंडारा/प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रातील गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने 'शिक्षण वाचवा-विद्यार्थी वाचवा' या घोषणेसह सोमवारी, 28 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी विशाल विद्यार्थी महारॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. या महारॅलीत विद्यार्थी, पालक, स्पर्धा परीक्षार्थी आणि शिक्षणप्रेमी हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या अडचणी दुर्लक्षित केल्यास मोठा सामाजिक उद्रेक होऊ शकतो. राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक आहे, असा या रॅलीद्वारे शासनाला इशारा देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही राज्य शासनाला देण्यात येणार आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठपासून रॅलीचा प्रारंभ सकाळी 11 वाजता होणार आहे. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, संभाजीनगर इथं पोहोचल्यावर त्याचं सभेत रूपांतर होईल. संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांतील विद्यार्थी प्रतिनिधी या महारॅलीत सहभागी होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या सामाजिक समस्येवर विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहनही एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आलं आहे.

... या आहेत प्रमुख मागण्या !

या रॅलीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

🔹 राज्यातील खाजगीकरण थांबवणे – शिक्षणाचा बाजार रोखा.

🔹 बंद होणाऱ्या शाळा वाचवा – ग्रामीण भागातील विद्यार्थी अडचणीत.

🔹 कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करा – शिक्षकी पदे कायमस्वरूपी भरा.

🔹 हजारो रिक्त पदे भरती करा – शिक्षणसंस्था अकार्यक्षम होण्याच्या मार्गावर.

🔹 वसतिगृहांची दुरावस्था – विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा नाहीत.

🔹 शिष्यवृत्ती वेळेवर – विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल अडतेय.

🔹 P. S. एज्युकेशन सोसायटीमधील ढासळलेल्या सुविधा तात्काळ सुधारा.

To Top