सोलापूर : सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा उळेगांवचे उपसरपंच नेताजी खंडागळे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी, २२ जुलै रोजी बोरामणी येथील एस. व्ही. सी. एस. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना 1000 हून अधिक वह्यांचे वाटप करण्यात आले.
नेताजी खंडागळे हॆ सह्याद्री फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेले खंडागळे, एक उद्योजक आणि राजकीय पटलावरील नवोदित, निष्कलंक यशस्वी चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा ध्यास असणारे ज्ञान साधनेच्या मार्गातील अडथळे लक्षात घेऊन कार्य करणारे नेताजी खंडागळे सामाजिक उत्तरदायित्व भावनेने कार्य करीत आले आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पूज्य श्री वीरतपस्वी आणि तपोरत्नम् योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन नेताजी खंडागळे, सरपंचपती प्रा. राज साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक केदार विभुते, सोसायटी चेअरमन वजीर मुजावर, तंटामुक्ती अध्यक्ष रफिक मुजावर, केंद्र प्रमुख व्हनमाने, जि. प. प्रा. शाळा मुख्याध्यापक बणजगोळे, वैभव हलसगे, आकाश माशाळे, सैफन फुलारी, सुभाष भोसले, शिवराज विभुते, प्रकाश आवटे आदि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक अतनुरे यांनी महास्वामीजींची आशीर्वादीत हार, शाल, अहवाल पुस्तिका देऊन खंडागळे यांचा सत्कार केला. सर्व उपस्थित मान्यवरांच्या सत्कार, स्वागतानंतर सह्याद्री फाऊंडेशन च्या वतीने मुख्याध्यापक अतनुरे व पर्यवेक्षक बिराजदार यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणी ची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर खंडागळे यांनी वही वाटप प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक अतनुरे सर यांनी नेताजी खंडागळे यांच्या कार्याचं कौतुक करीत त्यांचं आभार व्यक्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रविण कुंभार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.