सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी संघ यात्रेनिमित्त 'संघ गंगा के तीन भगीरथ' हे नाटक राधिका क्रिएशन, पुणे नागपूर प्रस्तुत असून गुरूवारी, 03 जुलै रोजी सायंकाळी 6. 25 वाजता येथील हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून समाजप्रबोधन, समाज जागृती तसेच कला,साहित्य, संस्कृती, उद्योग आणि आधुनिकता या विविध विषयावर सोलापूरकरांना नवनवीन उपक्रमाची मेजवानी देण्यात येते. 
त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंषचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी आणि तृतीय सरंसघचालक मधुकर दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब देवरस या महान व्यक्तींच्या जीवनावर आधारीत नाट्य कलाकृती सादर करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वराज रिस्पॉन्सिबल रिव्हाल्वेशन यांच्या सहकार्याने हे नाटक रंगमंचावर सादर होणार आहे.
आजच्या पिढीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय होता आणि काय आहे याची माहिती व्हावी आणि सरसंघचालकांचे कार्य त्यांचे जीवन कसे होते, याचे सादरीकर या संघ गंगा के तीन भगीरथ या नाटकातून होणार आहे. 
सोलापूरकरांसाठी ही सुवर्ण संधी मसाप दक्षिण शाखेने आणली आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी उपाध्यक्ष प्रा.दिपक देशपांडे यांनी केले.
हे नाटक दोन अंकी असून सोलापूरमध्ये हा शुभारंभाचा प्रयोग सादर करण्यात येणार असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. या नाटकाचे लेखक श्रीधर गाडगे, निर्देशक संजय पेंडसे, निर्माती सारीका पेंडसे, नेपथ्य सतीश पेंडसे आणि संगीत डॉ. भाग्यश्री चिटणीस यांनी दिले आहे.
