पोलिसांना ' पाहिजे ' असलेल्या गुंडाचा रविवारी पहाटे एन्काऊंटर

shivrajya patra

मोहोळ : पुण्यातील टिपू पठाण टोळीच्या कुख्यात गुंडाचं पोलिसांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी इथं रविवारी पहाटे एन्काउंटर केले. चंदननगरातील नरोटे वस्ती येथे रविवारी, पहाटे साडेतीनच्या सुमारास हा थरार घडला. शाहरूख उर्फ अट्टी शेख (वय-३३वर्ष) असे मृताचं नाव आहे. पुणे पोलिसांना ' पाहिजे ' असलेला शाहरूख पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून लांबोटीत काकांच्या घरी लपून राहिला होता.

पुण्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्यावर मकोकासारखे १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख हा मूळ पुण्याचा पोलिसांना गुंगारा देत तो आठ दिवसांपासून लांबोटी येथे राजू अहमद शेख या आपल्या मावस काकाच्या घरी पत्नीसह राहत होता. पोलिस शोध घेत होते, तेव्हा खबऱ्यामार्फत त्यांना आरोपी लांबोटीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी १४ जून रोजी रात्री सापळा रचल्या. १५ जूनला पहाटे पथकाने घरी छापा टाकून त्याचा 'गेम' केला. 

घटनेनंतर फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले, तेथून २ गावठी बनावटीची पिस्तुले, ९ जिवंत काडतुसे, २ लोखंडी कोयते अशा वस्तू जप्त करण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलंय.

... चौकट 

खंडणी वसुलीत नामचिन शाहरुख

सोलापूरजवळील लांबोटी गावात एन्काउंटर झालेला शाहरुख शेख हा पुण्यातील नामचिन गुंड होता. कुख्यात टिपू पठाण गंगचा तो सदस्य होता. हडपसर भागात टिपू पठाण व त्याच्या टोळीची प्रचंड दहशत आहे. शाहरुखनेही याच भागात अनेक गुन्हे केले असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. 

सय्यदनगर भागातील एका महिलेची जमीन पठाण आणि साथीदारांनी बळकाविली होती. हा ताबा सोडण्यासाठी महिलेकडे २० लाख रुपये खंडणी मागितली होती. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पठाण, शाहरुखसह त्याच्या गँगमधील ८ जणांवर गुन्हा दाखल झाले होते. तेव्हापासून शाहरुख फरार होता, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

... जे गुन्हेगारी सोडत आहेत, त्यांना जबरदस्तीने गुन्ह्यात ढकलण्याचे काम सुरू : रहीम हसन शेख 

शाहरुखचे वडील रहीम हसन शेख म्हणाले, तो गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. सुमारे १० ते १२ दिवसांपूर्वी तो माझ्या आत्याच्या घरी आला होता. तिथेच पुणे पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला. तीन महिन्यांपूर्वी आमच्या घराच्या पार्किंगमधून शाहरुखची मोटारसायकल पोलिस घेऊन गेले. गाडी चोरीचा आरोप करत त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे माझ्या डोळ्यासमोर त्याला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. चेहरापट्टी करण्यासाठी बोलावलं असताना 'का आला नाहीस?' म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. 

शाहरुख पूर्वी गुन्हेगारीत होता. पण सध्या गुन्हेगारी सोडून चांगल्या मार्गावर चालायला सुरुवात केली होती. त्याने चप्पल विक्रीचे दुकान सुरू केले होते. पण पोलिसांनी त्याला पुन्हा गुन्हेगारीच्या दिशेने ढकलले. आता नेमके काय झाले, हे मला माहीत नाही. जे लोक गुन्हेगारी सोडत आहेत, त्यांना पुन्हा उचलून, जबरदस्तीने गुन्ह्यात ढकलण्याचे काम सुरू आहे. उगाच 'टिपू पठाण' ची वरात काढली जात आहे. त्याच्यावर मोक्का लावला आहे. पहिल्या 'मकोका' प्रकरणात त्याला जामीन मिळाला होता. दुसऱ्यांदा जबरदस्तीने गोवून 'मकोका' लावण्यात आल्याचा आरोप रहीम हसन शेख यांनी उपस्थित केलाय.

.... जिल्ह्यात सात वर्षानंतर एन्काउंटर

यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात २०१७ मध्ये सोलापूर-तुळजापूर महामार्गावर उळेगांव शिवारात एन्काउंटर घडले होते. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगा (तळे) येथील विनायक काळे याला सोलापूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक पाटील यांनी गोळी घालून ठार केले होते. त्यानंतर ही दुसरी घटना घडलीय.

To Top