मोहोळ/यासीन आत्तार : व्यवसाय करण्यासाठी लागणारे वैद्यकीय पदवी व प्रमाणपत्र नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णावर फसवणुकीने उपचार करून पैसे उकळणाऱ्या स्वयंघोषित डॉक्टरने उपचार केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही बोगसगिरी उजेडात आलीय. आलोक सुशांत विश्वास (वय-३२ वर्षे, हल्ली वाळूज) असं या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील सोमनाथ रणजित राक्षे (वय-२० वर्षे) याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे पत्र मोहोळ पोलिसांकडून नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पाथरूडकर यांना आषाढी वारी पंढरपूर येथे ड्युटी असल्याने त्यांनी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी तात्यासो जाधव यांची नियुक्ती करून त्यांना कारवाई करण्याबाबत कळविले होते.
त्यानुसार डॉ. तेजस्विनी जाधव, कर्मचारी आरोग्य सेविका गायकवाड मिना, आरोग्य सहाय्यिका एम. एम. कोळी, आरोग्य सेविका श्रीमती उज्वला व्यवहारे, औषध अधिकारी महाडिक, आरोग्य सुपरवायझर एम. बी. थोरात, हिवताप परिवेक्षक पंचायत समिती मोहोळ बळवंत शिंदे तसेच मोहोळ पोलीस ठाणेचे पोहेकॉ/३४६ चव्हाण यांच्यासह शुक्रवारी सकाळी आलोक विश्वास यांच्या वाळूज येथील दवाखान्यास भेट दिली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार चौकशीसाठी गेलेल्या डॉ. तेजस्विनी जाधव व त्यांच्या पथकाने आलोक विश्वास यांच्या दवाखान्यात जाऊन सोमनाथ रणजित राक्षे (वय-२० वर्षे) याच्यावर केलेल्या उपचाराची कागदपत्रे घेत असताना, अलोक विश्वास याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे पडताळणीत मिळून आले नाहीत. पडताळणी होवुन अहवाल सादर करणेबाबत विनंती करण्यात आली होती.
त्या दवाखान्यामध्ये उपलब्ध असलेले वैद्यकिय क्षेत्रातील साहित्य, मेडिसन यांचा उल्लेख पंचनामा मध्ये केलेला आहे. सदरचा पंचनामा तपासणी पथकासमोर केल्याचे प्रमाणित केले आहे. सदर दवाखान्यात सापडलेली औषधे पाहता, ते माँडर्न मेडिसिन म्हणजे आँलोपॅथिकचा व्यवसाय करत असल्याचे दिसुन येते. मात्र असा व्यवसाय करण्यासाठी लागणारे वैद्यकीय पदवी व प्रमाणपत्र त्याचेकडे मिळुन आले नाही.
घटनास्थळ पंचनामा करतेवेळी, ग्रामस्थाशी चर्चा केल्यानंतर डॉ. आलोक विश्वास हा मान्यता प्राप्त पदवी शिवाय व्यवसाय करून पेशंन्टकडून पैसे घेऊन फसवणुक करीत आहे. त्याचेकडे कायदेशिर ज्ञान नसताना वैद्यकीय व्यवसाय करून जनतेच्या आरोग्यास व जिवितास धोका निर्माण करीत आहे. तसेच तो महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अँक्ट 1961 किंवा इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट 1956 अंर्तगत नोंदणी नसताना बेकायदेशिरपणे वैद्यकीय व्यवसाय करित आहे.
या गावात गेल्या ०६ वर्षापासून वैद्यकीय सेवेच्या नावाखाली सामान्य रुग्णांची फसवणूक करीत आलेल्या अलोक सुशांत विश्वास ( रा. बेराबेरिया थाना आमडंगा जिल्हा-उत्तर थब्बीस पिजीएस, राज्य पश्चिम बंगाल सध्या रा. वाळुज, ता मोहोळ) यांचेकडे वरील प्रमाणे नोंदणी अगर शैक्षणिक पात्रता दोन्ही गोष्टी नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरूध्द इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट 1965 कलम 15 (2) व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट 1961 चे कलम 33 (2) नुसार तसेच भारतीय न्याय संहिता कलम 318(2),319 (2) प्रमाणे कायदेशिर फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.