सोलापूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने राज्यभर शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणीचे प्रशिक्षण सुरु आहे. या प्रशिक्षण साठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे (एससीईआरटी )ने प्रत्येकी दोन हजार रुपयांच शुल्क आकारले आहे. प्रशिक्षण वेळ सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडे पाच अशी आठ तासांची वेळ आहे. प्रशिक्षणमध्ये दररोज पाच वेळा मस्टरवर सही करणे बंधनकारक आहे. हे शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखं असून ते थांबविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
निर्धारीत वेळेपेक्षा एक-दोन मिनिटे स्वाक्षरीला विलंब झाला तरी ऑनलाईनमध्ये नाव गायब होते. या बाबी प्रत्यक्ष पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी सोलापूर येथील दमाणी प्रशालेतील प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.
यावेळी निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण विभागाचे समन्वयक सारंग पाटील, तज्ञ मार्गदर्शक शहाजी ठोंबरे तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणार्थी सरदार नदाफ, मुख्याध्यापक नितीन गायकवाड, निर्मला मौळे यानी त्यांचे स्वागत केले. यावेळी अनेक शिक्षकांनी समस्या मांडल्या.
यामध्ये आरिफा सय्यद, प्रभाकर धावणे, अशपाक आतार, मनोज बशेट्टी, इत्यादी शिक्षकांनी समस्या मांडल्या. बैठक व्यवस्था सुलभ असावी, दररोजची वेळ आठ तासापेक्षा कमी असावी, अधिकारी यांनी दबावतंत्राचा वापर करू नये, जेणेकरून शिक्षक ताण-तणावाखाली येणार नाहीत. तणावाखाली येऊन मंगळवारी, शिवप्रभू प्रशालेचे एक शिक्षक प्रभाकर धावणे (अकोलेकाटी, ता. उत्तर सोलापूर) यांचा अपघात झाला असून असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, याची दक्षता घ्यावी.
यावेळी प्रशिक्षण केंद्रातून अण्णासाहेब भालशंकर यांनी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे पुणे विभागाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शिक्षक प्रशिक्षणार्थी यांची कुचंबणा थांबविण्याची मागणी केलीय.