... विचार करुन साक्ष दे, नाही तर तुला हे महागतच पडेल; साक्षीदाराला धमकी

shivrajya patra

मोहोळ/प्रतिनिधी : न्यायालयात विचार करुन साक्ष दे, नाही तर तुला हे महागतच पडेल, अशा शब्दात एका साक्षीदाराला धमकी देण्यात आली. हा प्रकार येथील आंबेडकर चौकात मोहन माळी यांचे हॉटेलमध्ये शुक्रवारी सायंकाळी घडली. दादासाहेब अण्णा हेळकर (वय 35 वर्षे) असं साक्षीदाराचं नांव असून त्यास धमकी दिल्याप्रकरणी विकास बनसोडे याच्याविरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पोखरापूर येथील दादासाहेब अण्णा हेळकर आणि विकास बनसोडे एकमेकांचे ओळखीचे आहेत. मोहोळ शहरातील सिद्धार्थ नगर येथे राहणारा सतिश नारायण क्षीरसागर (वय-24 वर्षे) हा दादासाहेबसोबत त्याच्या मोबाईल दुकानात काम करीत होता. 

कुरुल ते मोहोळ रोडवर पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरात धडक दिल्याने सतिश क्षीरसागर जागीच मरण पावला. ही दुर्घटना 01 जुलै 2021 रोजी घडली. या अपघात प्रकरणी दाखल गुन्ह्यात दादासाहेब हेळकर साक्षीदार आहे. शुक्रवारी, 13 जून रोजी दादासाहेब मोबाईल शॉपीमध्ये काम करित असताना त्याच्या दुकानासमोरच राहणारा तसेच परिचयाचा विकास बनसोडे त्याच्या मोबईलला कव्हर बसविण्याचे निमित्तानं शॉपवर आला.

त्यावेळी त्या मोबाईल चं कव्हर दुकानात नाही, असं सांगीतल्यानंतर ' चहा घेऊ या चल ' असं म्हटल्यावर ते दोघे मिळून आंबेडकर चौक येथील मोहन माळी यांचे हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी गेले. तिथं तुझी येत्या 23 जून रोजी सोलापूर न्यायालयात साक्ष आहे, असे वाटते, मग तू कोणाच्या बाजुने साक्ष देणार ? असं विकास ने विचारले.

त्यावर, 'जे काही सत्य आहे, ते सांगणार' असं बोलल्यानंतर त्याने दादासाहेबला, तुला चौकात दुकान चालवायचे आहे. तु मोहोळ ते पोखरापुर असे ये-जा करित असतो, मग विचार करून साक्ष दे, अन्यथा तुला महागातच पडेल अशी धमकी विकास ने दिली.

या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार विकास बनसोडे (रा. आंबेडकर चौक, मोहोळ) याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा, भा. न्या. सं. कलम 351(2) प्रमाणे दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार भोसले या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top