व्यापारी कुटुंबिय शिर्डी दर्शनाला; कुलूप तोडून 11 तोळे सोन्याच्या दागिन्याची चोरी

shivrajya patra

सोलापूर : व्यापारी कुटुंबातील सर्व जण शिर्डी येथे साई देवदर्शनासाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून ५,५०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शेळगी परिसरातील महेश थोबडे नगरात शुक्रवारी दुपारपूर्वी घडली. याप्रकरणी शिवानंद लिंगण्णा कडबगावकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कडबगावकर कुटुंबीय गुरुवारी, 12 जून रोजी सकाळी देवदर्शनाच्या निमित्ताने शिर्डीला गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यानं त्या बंद घराचा कडी-कोयंडा, कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी तसेच लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सरकारी किंमतीनुसार सुमारे २,००,००० रुपये किंमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या हातातील पाटल्या, ७५,००० रुपये एक सोन्याचे १५ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, २५,००० रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अमेरीकन गुलाबी रंगाचा खडा असलेली अंगठी, ५०,००० रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील एक जोड रिंग, ५०,००० रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मुलीच्या हातातील एक जोड बांगड्या आणि १,५०,००० रुपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा चपलाहार असे ११ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.

कडबगावकर कुटुंबीय काल दुपारी परत आल्यावर त्यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा. न्याय संहिता कलम ३०५ (a), ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


To Top