डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडन्ट अँड युथ असोसिएशन व दयानंद कॉलेज यांचा संयुक्त उपक्रम
सोलापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडन्ट अँड युथ असोसिएशन, सोलापूर आणि दयानंद कॉलेज, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, १४ जून रोजी नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या भरती मेळाव्यात 45 युवक-युवतींना टाटा मोटर्स कंपनीत नोकरीची संधी प्राप्त झाली असून त्यांना नोकरीचे ऑफर लेटर प्रदान करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडन्ट अँड युथ असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम नवघरे आणि दयानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या मेळाव्याला युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

टाटा मोटर्सच्या क्विस कॉर्प येथील अधिकारी प्रकाश पवार यांनी मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशनचे मोहसिन मोकाशी, आतिक भाई अरब, अबूबकर उस्ताद व दयानंद कॉलेजचे शिक्षक कर्मचारी व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी तसेच पदवीधर तसेच बारावी उत्तीर्ण युवकांची संख्या लक्षात घेता, या मेळाव्याचे आयोजन टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने कॅम्पस ड्राइव्हच्या माध्यमातून करण्यात आले. या मेळाव्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.