कुमठे कनिष्ठ महाविद्यालय कुमठे येथे छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी
सोलापूर : छत्रपती शाहू महाराज यांनी सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीबरोबरच शेतकऱ्यांसाठी बहुमोल कार्य केले. राधानगरी धरण त्याचं प्रतिक आहे. आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ब्रह्मदेवदादा माने यांचेही कार्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना प्रेरणास्थानी मानून होते, असं प्रतिपादन प्रा. दादाराव डांगे यांनी व्यक्त केले.
कुमठे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये छत्रपती शाहू महाराजांची 151 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. हणमंत शिंदे व प्रमुख वक्ते प्रा. दादाराव डांगे होते.
राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने बहुजनांचे राजे होते. त्यांनी बहुजन उद्धारासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी शाळेची स्थापना केली. त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजनाही चालू केली होती. त्यांच्याकडं आरक्षणाचे जनक म्हणून पाहिले जाते, असंही प्रा. दादाराव डांगे यांनी सांगितले.
यावेळी प्रा. हणमंत शिंदे यांनी बोलताना, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. संजय जाधव, प्रा. दीपक शिंदे, प्रा. विजयकुमार वाळके-पाटील, प्रा. विनोद थोरात, प्रा. राजीव निकम आणि प्रा. बंडोपंत बाबर उपस्थित होते.
