जिजाऊ ज्ञान मंदिरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
सोलापूर : आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची ओळख संपूर्ण 'देशाला आजही आहे. अशा या महान ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला त्रिवार मानाचा मुजरा करण्याबरोबरच शाहू महाराजांचे शिक्षण, कृषी, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील मोलाचे योगदान आपल्याला कायम दिशादर्शक आणि मोलाचे ठरेल, असं प्रतिपादन संस्थापक गणेश निळ यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलामध्ये आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर गणेश निळ बोलत होते.
प्रारंभी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रशालेतील चिमुकल्या बालकांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन प्रवासातील निवडक प्रसंगावर इंग्रजीतून विचार प्रकट केले. तत्पूर्वी कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका अर्चना औरादे यांनी केले तर अमय देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी दादासाहेब नीळ यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला मराठी मधून उजाळा देताना छत्रपती शाहू महाराज हे लोक कल्याणकारी राजे होते, हे सांगताना राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील अनेक घटना आणि प्रसंगांना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचा आदर्श घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन किरण वाडीकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक वैभव मसलकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


