मोहोळ/विष्णु शिंदे : डॉ. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील मनोविकृती शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नितीन नागनाथ अभिवंत यांचं ट्रेकिंग दरम्यान श्वासोच्छ:वासात अडथळा आल्याने निधन झालं. मूळचे मोहोळ तालुक्यातील देवडी येथील रहिवासी असलेले डॉ. नितीन अभिवंत मृत्यूसमयी ४२ वर्षीय होते. त्यांच्या पश्चात डॉ. पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
डॉ. अभिवंत मुंबई येथून शनिवारी, ०७ जून रोजी महाविद्यालयीन मित्रासोबत ट्रेकिंग साठी गेले होते. हिमालयातील बुरान व्हॅली ट्रेकिंग दरम्यान त्यांना श्वासोच्छ:वासात अडथळा आल्याने निधन झालं. त्यांच्यावर बुधवारी, ११ जून रोजी देवडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील पाच वर्षाच्या सेवापूर्तीनंतर त्यांना ससून रुग्णालयातील मनोविकृती शास्त्र विभागात २०१४ पासून सेवेची संधी मिळाली होती. डॉ. अभिवंत यांच्या कार्य तत्पर शैलीमुळे त्यांनी रुग्णालय वर्तुळात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या अकाली निधनावर अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या असल्याचं सांगण्यात आलंय.