सामान्यांच्या मनात ' वर्दी ' विषयी भय निर्माण करणारी घटना; भाजपा शहराध्यक्षांनी केली कारवाईची मागणी

shivrajya patra

सोलापूर : वाहतुकीचे नियम मोडल्याच्या सबबीखाली सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सत्ताधारी पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यास भरचौकात लत्ता प्रहार केलाय. सामान्य नागरिकांच्या मनात ' वर्दी ' विषयी भय निर्माण करणारी घटना गुरुवारी घडलीय. सुधीर खिरडकर असं त्या अधिकाऱ्याचं नांव असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केलीय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर चे अल्पसंख्यांक विभागाचे महामंत्री जिशान मोहम्मद सलीम सय्यद याला किडवाई चौकात  सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी लत्ता प्रहार केल्याच्या प्रसंग सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. जिशान सय्यद यानं वाहतुकीचे नियम मोडलेले असतील तर वाहतूक नियमाप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी, इतकीच माफक अपेक्षा सामान्यांची असते.

मात्र वाहतुकीच्या नियमाप्रमाणे कारवाई न करता, आपल्या वर्दीचा धाक दाखवून एखाद्या नामचीन गुंडांसारखा व्यवहार करीत शिव्यांची लाखोली वाहत पोलिसांनी 'लाथ' घालण्याचा अधिकार काेणत्या नियमात बसत असावा, असा सवाल त्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी यावेळी व्यक्त केला.

कायद्याच्या चौकटीच्या आधीन राहून कायद्याच्या चौकटीत राहून काम न करता मला टार्गेट करून संबंधित पोलीस अधिकारी शिरडकर यांनी मारहाण केल्याचा आरोप जिशान सय्यद यानं केला आहे.

तो भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी तसेच समाजसेवक असून, त्यांनी जाणून-बुजून समाजात आमच्या पार्टीच्या भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महामंत्री यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी मारहाण केलेली आहे, असं निवेदन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्या शहराध्यक्ष जाकिर मौलाली सगरी यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना दिलेल्या निवेदना म्हटले आहे. यावेळी भाजपा  शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर याही उपस्थित होत्या.

... चौकट ...


' त्या ' अधिकाऱ्यावर व्हावी शिस्तभंगाची  कारवाई : रोहिणी तडवळकर 

 मुस्लिम समाजात चुकीचा संदेश देण्यासाठी पोलीस उपायुक्त सुधीर खिरडकर यांनी चौकात मित्रांशी बोलत थांबलेल्या आमच्या कार्यकर्त्यास मारहाण केलेली आहे. त्या पोलिस अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई व मानहानी चे गुन्हे दाखल करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी. कारण कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, हे पोलीस दलात जबाबदारी आणि कार्यक्षमतेची भावना वाढवण्यासाठी आवश्यक आहे, या शब्दात भाजपा शहराध्यक्ष तडवळकर यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

To Top