सोलापूर : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक आवारातून अज्ञातानं ०३ वर्षीय बालिकेचं अपहरण केलय. ही घटना बस स्थानक परिसरात शुक्रवारी, १६ मे रोजी सकाळी ११.४० वा. च्या सुमारास घडलीय. ईश्वरी लक्ष्मण शिंदे असं अपहरण झालेल्या बालिकेकं नाव आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील रहिवासी लक्ष्मण साहेबराव शिंदे हल्ली शिवशक्ती हॉटेलच्या पाठीमागे, विजयकुमार दिघे यांचे घरात भाड्याने वास्तव्यास आहेत. ते त्यांची पत्नी व मुलगी ईश्वरी यांना एस. टी. ने बार्शी येथे पाठविण्यासाठी बस स्थानक परिसरात आले होते.
शिंदे बार्शीला जाणाऱ्या विना थांबा एस. टी. चे तिकीट काढण्याकरिता रांगेत थांबले असता, सुट्टे पैसे मागण्याकरीता पत्नीस तिकीट खिडकीजवळ बोलावून घेतले. त्यांच्या पत्नीने मुलगी ईश्वरी ला ती जिथे थांबली होती, तिथंच सोडून सुट्टे पैसे देण्याकरीता आली.
ती थांबलेल्या ठिकाणी परत गेली असता, मुलगी ईश्वरी ही तिथं दिसून आली नाही. बालिका ईश्वरी त्या ठिकाणावरून हरविल्याच्या माहितीनं धास्तावलेल्या शिंदे दाम्पत्यांनं सीसीटिव्ही फुटेज पाहिले. त्यात कोणीतरी एक अनोळखी महिला ईश्वरी हिस घेऊन जात असल्याचे दिसून आले.
त्या अनोळखी महिलेनं ईश्वरीचे अपहरण केल्याचे दिसून आल्यावर लक्ष्मण साहेबराव शिंदे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार ईश्वरी हिला पळवून नेल्याप्रकरणी त्या महिलेविरुध्द भा. न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
