सोलापूर : घरफोडीच्या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या विश्वसनीय खबरीनुसार चोरी-घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी व्यवसायाने पेंटर असलेल्या शिवा सत्यनारायण अलवाल (वय-२९ वर्षे) यास वेगळा उद्योग करताना ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी करता, त्याने चोरी-घरफोडीच्या ०५ गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून लाखाची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ०२,६४,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवार पेठेतील 256 गाळा येथील रहिवाशी संतोष अंबादास येरला देवदर्शनाच्या निमित्ताने पंढरपूरला गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार या वर्षात 20 जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेचे स. पो. नि. संदिप पाटील व त्यांचे तपास पथकाने शिवा अलवाल (व्यवसाय-पेंन्टर, रा. १५७३, पद्मशाली चौक, दाजी पेठ, सोलापूर, सद्या रा. शिवसेना नगर, नवीन विडी घरकुल, हनुमान मंदिराचे जवळ, कुंभारी, सोलापूर) यास ०३ मे रोजी ताब्यात घेतले. त्याच्या झाडाझडतीत कर्जबाजारीपणा व व्यसनाधीनतेतून संतोष येरला याच्या घरात घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्याने चालू वर्षात ४ घरफोडी-चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानं सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन गुन्हे तर सलगर वस्ती, जेलरोड आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा केला असल्याची कबुली दिली. ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४१५ ग्रॅम चांदीचे दागिने, १,००,००० रूपयांची रोकड, ०१ गॅस टाकी आणि ०१ पितळी हंडा असा ०२,६४,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. संदिप पाटील, व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, योगेश सावंत आणि चालक सतिश काटे यांनी पार पाडली.