'एक जिल्हा, एक नोंदणी' मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

shivrajya patra

नक्शा उपक्रमा अंतर्गत पंढरपूर हा पायलट प्रोजेक्ट असून हा उपक्रम राज्यात लागू करणार

सोलापूर : जिल्ह्यातील नागरिकांना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून एक जिल्हा एक नोंदणी मोहिमेंतर्गत उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. याच योजनेच्या अनुषंगाने पुढील काळात शासन संपूर्ण राज्यासाठी 'एक राज्य, एक नोंदणी' हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

नियोजन समितीच्या सभागृह येथे आयोजित नोंदणी व मुद्रांक तसेच भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा आढावा बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार सर्वश्री समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, उत्तम जानकर, रणजीत सिंह मोहिते पाटील, राजू खरे, अभिजीत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, सह जिल्हा निबंधक खोमणे, जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक सचिन भंवर, यांच्यासह नोंदणी व मुद्रांक विभागाचे तसेच भूमी अभिलेख विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

'एक जिल्हा, एक नोंदणी' अंतर्गत जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून नागरिकांना आपल्या प्रॉपर्टीची नोंदणी करता येते.  आज रोजीपर्यंत जिल्ह्यातील सहाशे दोन नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच मंत्रिमंडळाने 500 रुपयात शेतकऱ्यांचे जमीन वाटपाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचीही जिल्ह्यात योग्य अंमलबजावणी करावी. 

नोंदणी व मुद्रांक कार्यालयाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे तसेच प्रत्येक महिन्यातून या कार्यालयाची एक बैठक घेऊन त्यांनी केलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन या अंतर्गत नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध होतात का याबाबत खात्री करावी, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

नोंदणी व मुद्रांक कार्यालयाने शासनाची भूमिका लक्षात घेऊन आपल्या कामात सुधारणा कराव्यात तसेच नागरिकांच्या दस्त नोंदणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वसामान्यांची अडवणूक होणार नाही या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

प्रारंभी सह जिल्हा निबंधक खोमणे यांनी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.

स्वामीत्व योजना टप्पा 2 अंतर्गत गावठाणाबाहेरील घरांची मोजणी करण्यात येणार : चंद्रशेखर बावनकुळे

केंद्र शासनाच्या स्वामीत्व योजना टप्पा एक अंतर्गत ड्रोणद्वारे गावातील घराची मोजणी करण्यात येत आहे. यातील बहुतांश काम पूर्ण झालेले असून प्रत्येक गावात गावठाणाबाहेर असलेल्या घरांची मोजणी करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्वामीत्व योजना टप्पा क्रमांक दोन सुरू करण्यात येणार आहे. तरी या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने गावठाणाबाहेरील घरांची मोजणी करण्याच्या अनुषंगाने माहिती तयार ठेवावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

केंद्र शासनाच्या नक्शा उपक्रमांतर्गत राज्यातील 10 शहरांचा समावेश असून त्यापैकी पंढरपूर हे एक शहर आहे. भूमी अभिलेख विभागाने पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व घरांची ड्रोनद्वारे मोजणी करून प्रॉपर्टी कार्ड तयार करून ठेवावे. पंढरपूर येथील काम हे एक पायलट प्रोजेक्ट म्हणून करावे व हाच उपक्रम पुढे राज्यासाठी लागू करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. 

भूमी अभिलेख विभागाने अत्यंत पारदर्शकपणे काम करावे. सर्वसामान्य नागरिकांच्या या विभागाविषयी खूप तक्रारी आहेत त्या तक्रारी येणार नाहीत या अनुषंगाने कार्यपद्धतीत बदल करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

राज्य मंत्रिमंडळाने नुकताच पोट हिस्सा मोजणीसाठी शेतकऱ्याकडून फक्त दोनशे रुपये घेण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात त्याची प्रभावीपणे अंमलबजवणी करावी. सर्व मोजणी प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत. आपल्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संबंधित आमदार यांच्याशी संपर्क करून त्यांना विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दर तीन महिन्याला द्यावी, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सुचित केले.

प्रारंभी जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक सचिन भंवर यांनी विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. यामध्ये स्वामीत्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे 643 गावाची मोजणी पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. काही गावांचा विरोध होता, परंतु समुपदेशन करून बहुतांश गावांचे ड्रोन फ्लाय पूर्ण झालेले आहे असे सांगून भूमी अभिलेख विभागाच्या वतीने पारदर्शकपणे कारभार करून लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असं सांगितले.

To Top