Type Here to Get Search Results !

शिक्षण सोडण्याचा ' ती ' चा निर्णय बदलला... ' ती ' ला सव्वा लाखाच्या शिष्यवृत्तीनं वीरशैव व्हिजनची तपपूर्ती !


सोलापूर : ' ती ' च्या पित्याचे छत्र हरपलेले, आई बालवाडी शिक्षिका, आईचे तुटपुंजं वेतन, भावाचे शिक्षण सुरु, आजीचं आजारपण, पदव्युत्तर पदवीचे पहिले वर्ष बँक कर्ज घेऊन पूर्ण केलेले, दुसऱ्या वर्षीची फी भरणे तिच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे अशक्यप्राय बनलेले, त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडायचा निर्णय ' ती ' ने घेतला, मात्र वीरशैव व्हिजनने 1. 25 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिल्यामुळे ' ती ' ने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

गौरी तोटद असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सध्या एम. एस्सी. जैवतंत्रज्ञान विभागात बंगळुरू येथील रेवा युनिव्हर्सिटी येथे शिकत आहे. तिला वार्षिक दीड लाख रुपये फी आहे. पहिल्या वर्षीचे फी तिने बँकेकडून कर्ज काढून भरली. दुसऱ्या वर्षी फी भरण्यासाठी पैशाची उपलब्धता होत नव्हती. त्यामुळे तिने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिची माहिती वीरशैव व्हिजनपर्यंत पोहोचली, तेव्हा व्हिजनने तिला मदत करण्याचा शब्द दिला आणि तिचा निर्णय थांबवण्याची विनंती केली.

त्यावर वीरशैव व्हिजनने समाजबांधवांना तिच्या परिस्थितीची जाणीव करून दिली आणि मदतीचे आवाहन केले. यामध्ये महापालिकेचे निवृत्त अधिकारी वैजनाथ स्वामी यांनी 25 हजार व सिव्हिल इंजिनियर दिपक मड्डे यांनी 11 हजार दिले. पाहता पाहता 2 आठवड्यात 1 लाख रुपये जमले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या इंदुमती अलगोंड-पाटील यांनी कार्यक्रमात 25 हजार रुपये जाहीर केले अन् कार्यक्रम झाल्यानंतर गौरीला सुपूर्द केले. जवळपास तिच्या संपूर्ण फीची व्यवस्था झाली आहे. अशा प्रकारे व्हिजनने तिला दिलेला शब्द पूर्णत्वास नेला. 

यंदाच्या वर्षी वीरशैव व्हिजनच्या स्थापनेला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. ती सोलापूरला आली असता, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अलगोंड-पाटील यांच्या हस्ते व सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमित रोडगे,  गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर वैजनाथ स्वामी, सिव्हिल इंजिनिअर दीपक मड्डे, वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या उपस्थितीत एक लाखाचा धनादेश गौरीच्या हातात सुपूर्द करण्यात आला. अशाप्रकारे वीरशैव व्हिजनची तपपूर्ती साजरी करण्यात आली.

यावेळी सोलापूर जनता सहकारी बँक, जुळे सोलापूर शाखेचे व्यवस्थापक बसवराज मद्दरकी, संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, संजय साखरे, महिला आघाडीच्या सचिवा माधुरी बिराजदार, बद्रीशकुमार कोडगी, अविनाश हत्तरकी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी हौदे यांनी तर राहुल बिराजदार यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित कलशेट्टी, सिद्धेश्वर कोरे, अमोल कोटगोंडे, नागेश पुळुजकर यांनी परिश्रम घेतले. 

फोटो ओळी : गौरी तोटद हिला सव्वा लाखाची शिष्यवृत्ती देताना इंदुमती अलगोंड-पाटील, सविता मोरे-पाटील, अमित रोडगे, वैजनाथ स्वामी, दीपक मड्डे, विजयकुमार बिराजदार, राहुल बिराजदार

...चौकट...

आजवर वीरशैव व्हिजनकडून 161 जणांना शिष्यवृत्ती 

वीरशैव व्हिजन प्रसंगी सदस्यांकडून वर्गणी, समाजबांधवाकडून देणगी, श्री काशी पीठ, कै. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान, श्रीराम पुजारी प्रतिष्ठान, सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे), कॅ. विनायक तांबेकर प्रतिष्ठान, लोटस् फाउंडेशन, छाया-प्रकाश प्रतिष्ठान आणि दानशूर व्यक्तींकडून ही मदत मिळून देण्याचा प्रयत्न करीत आली आहे. आजवर वीरशैव व्हिजनकडून 161 जणांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.