माय फॅमिली स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं टाकलेल्या छाप्यात ०४ महिलांची सुटका
सोलापूर : माय फॅमिली स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने टाकलेल्या छाप्यात मसाज सेंटर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालणाऱ्या कुंटणखान्यावर कारवाई केली. या छाप्यात ०४ पिडीत महिला सुटका करण्यात आली असून न्यायालयानं चालक विशाल चंद्रकांत धोत्रे याला पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले.
विजापूर रस्त्यावरील अत्तार कॉम्प्लेक्स नोबल हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर माया फॅमिली स्पा सेंटर च्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर खबर मिळाल्याने शुक्रवारी, २३ मे रोजी पोलीस आयुक्तालयाकडील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार त्या ठिकाणी छापा टाकण्याकरिता गेले.
पोलीस बिल्डींगमध्ये येऊ नये, म्हणून तेथे लिफ्ट बंद केली होती, तसेच जिन्याचे लोखंडी गेट कुलूप लावून बंद केल्याचे दिसून आले. शेजारी बिल्डींगमध्ये असलेली लोखंडी शिडी पोलिसांनी शिताफीने मिळवून पहिल्या मजल्यावर प्रवेश करून छापा टाकला. त्या ठिकाणी ०४ पिडीत महिला मिळून आल्या. पिडीतांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत होता.
हे स्पा सेंटर चालविणारा विशाल चंद्रकांत धोत्रे (वय-३२ वर्षे, रा. झोपडपट्टी नंबर १ जुना विजापूर नाका, सोलापूर) आणि माया फॅमिली स्पा चा मालक संदेश साळवे (राहणार : ठाणे) या दोघांविरूध्द म.पो.ह. अकिला युसुफ नदाफ यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५, ६ सह भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १४३ (२) (३) १४४ (२) प्रमाणे उभयतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत आहे. गुन्ह्यातील अटक आरोपीस न्यायालयानं गुन्ह्याच्या तपासकामी २७ मेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
ही कामगिरी प्रभारी पोलीस आयुक्त अजित बोऱ्हाडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरिक्षक महादेव राऊत, सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर, पो.हे.कॉ. महादेव बंडगर, म.पो.हे.कॉ. अकिला नदाफ, म.पो.हे.कॉ. सुशिला नागरगोजे, म.पो.हे.कॉ. नफिसा मुजावर, म.पो.कॉ. सुजाता जाधव, म.पो.कॉ. सीमा खोगरे, म.पो.कॉ. उषा मळगे, म.पो.कॉ. चिकमळ, पो.हे.कॉ. शैलेश बुगड (नेमणूक : गुन्हे शाखा) चालक पो.कॉ. दादा गोरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
... नागरिकांना आवाहन ...
अशा प्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालत असल्यास त्याबाबतची माहिती पोलीसांना द्यावी, असं आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आलं आहे.