सोलापूर : शालेय पोषण आहार योजना डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटना, महाराष्ट्र राज्याच्या वतीने कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी संस्थापक दीपक पसरटे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने सोलापूर च्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर करण्यात आलीय.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत करिता शासन निर्णयानुसार कंत्राटी तत्त्वावर डेटा एट्री ऑपरेटरचे 433 पदे भरण्यात आलेली आहेत. आज अखेर 300 पदे कार्यरत असून 133 पदे रिक्त आहेत. असं या निवेदनात म्हटले आहे.
शासनाने निर्गमित केलेल्या सेवानियमावली नुसार सदर डेटा एन्ट्री ऑपरेटर कर्तव्य व जबाबदारी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. सध्या स्थितीत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना दरमहा १ सप्टेंबर २०२४ पासून २५००० मानधन देण्यात येत आहे. ते कामाच्या तुलनेत अतिशय तुटपुंजे मानधन असूनही 14 वर्षे पासून डाटा एन्ट्री ऑपरेटर सातत्याने जीव ओतून काम करत आहेत.
कंत्राटी कर्मचारी सुद्धा कायमसेवेत असलेल्या कर्मचाऱ्यापेक्षा दुपटीने काम करतो, तरी त्याला महागाई भत्ता लागू होत नाही, मग कंत्राटी कर्मचारी अशीच महागाईची झळ सोसावी, हे धोरण कुठे तरी मानवाच्या अधिकारावर गदा आणणारं आहे.
शासन कर्मचारीसाठी आजपर्यंत ७ वा वेतन आयोग लागू करून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे, तर दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी यांनी सेवेत आपले अर्धे आयुष्य खर्ची घातले तरीसुद्धा एक वेतन आयोग त्यांना लागू करणे तर सोडाच साधे किमान वेतना कायदा १९४८, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या आदेशानुसार समान काम समान वेतन सुद्धा लागू करण्यात आलेले नाही, ही लोकशाही राज्यात अन्याय करणारी बाब आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीत कंत्राटी कर्मचारी सेवा करीत आहेत.
सर्वोच्च न्यायालय, यांचे आदेश क्रमांक 8157/ 2024 दिनांक 31 जाने. 2025 नुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील कायम कर्मचाऱ्यांएवढे समान वेतन द्यावे, असे आदेश निर्गमित करण्यात आलेत,याचा तरी विचार शासनाने करून कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना कायम कर्मचारी एवढे वेतन द्यावे, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, आणि १५ वर्षापासून जिवाचे रान करीत असलेल्या कंत्राटी कर्मचारी यांना न्याय मिळेल, अशी डेटा एन्ट्री ऑपरेटर्सची मागणी आहे.
याप्रसंगी निवेदन सादर करताना महिला कार्याध्यक्षा आयेशा बिराजदार (पुणे विभाग), पंडित गुरव, महताब शेख, नवीन गोरट्याल,आदी ऑपरेटर उपस्थित होते.
फोटो ओळी :
खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देताना प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे डेटा एन्ट्री ऑपरेटर छायाचित्रात दिसत आहेत.