श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था यांचा उपक्रम
सोलापूर : ह. भ. प. ज्योतीराम महाराज चांगभले यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन, भजन, भारुड, वारकरी दिंडी व शास्त्रीय वादन यांना मृदंग साथ करण्याचे शिक्षण दिले जाते. या संस्थेमुळे अनेक विद्यार्थी मृदंग वादनास तयार झाले आहेत, तयार होत आहेत. त्यामुळे निश्चितपणे ही मुले उद्याचे उत्कृष्ट मृदंग वादक आहेत. या संस्थेने आयोजित केलेला मृदंग तपस्या हा कार्यक्रम महाराष्ट्रातील एकमेव कार्यक्रम आहे, असं प्रतिपादन ह. भ. प. इंगळे महाराज यांनी केले.
जुनी लक्ष्मी चाळ श्री महादेव मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था यांचे कडून 01 ते 15 मे दरम्यान मृदंग तपस्या या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. 04 मे रोजी अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय परीक्षेला मृदंग वादन या विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी ह. भ. प. इंगळे महाराज बोलत होते.
उत्कृष्ट मृदंग वादक या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी मृदंग तपस्या हे साधन महत्त्वाचे आहे. मृदंग वादकांनी रोज रियाज करावा, असे मनोगत ह. भ. प. पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय सचिव ह.भ.प. बळीराम महाराज जांभळे, तबला विशारद संभाजी घुले, ह. भ. प. अरुण काका भोसले, ह. भ. प. गणेश महाराज वारे, सुनील चांगभले, किरण शेटे, ज्ञानेश्वर जाधव, गणेश चांगभले, अजिंक्य वैद्य आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.