सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम आणि अहिल्यादेवी होळकर विद्यापीठांचे प्रस्ताव : आमदार रोहित पवार !
सोलापूर (एएनबी) : येत्या ४ जूनपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी बुधवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, अनेक नवीन प्रतिभान खेळाडू निर्माण करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
" महाराष्ट्र प्रीमियर लीग '' या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा आहे.
------
अजय शिर्के नावाने पुण्यात राज्याची क्रिकेट अकादमी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर एमसीएची अकादमी सुरु करणार असून ही अकादमी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यात राज्याची अकादमी सुरु करण्यात येईल.
त्यानंतर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात, कोकण विभागासाठी दापोली, मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर, खानदेशसाठी जळगाव अशा चार ठिकाणी विभागीय क्रिकेट अकादमी सुरु करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात पहिली अकादमी सुरू करणार असल्याचेही अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले.
राज्याच्या अकादमीसाठी स्पेशल प्रशिक्षक तर विभागीय अकादमीसाठी तज्ञ प्रशिक्षक यासह परीक्षा दिलेला पंच, गुणलेखक, व्यवस्थापक प्रशिक्षक असणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला मैदानाची गरज आहे. त्यामुळे तीस वर्षाच्या करारावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान घेऊन ते उच्च दर्जाचे करून त्या माध्यमातून क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले.
सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम आणि अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी प्रस्ताव दिले आहेत. त्यांच्याशी शक्य तितक्या लवकर करार करून अकादमी सुरू करण्याचा मानस असल्याचेही आमदार पवार यावेळी बोलताना म्हणाले.
-------
लिलावासाठी ६५८ पुरुष आणि महिला खेळाडूंचा सहभाग !
या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी एकूण ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते. ज्यामधून संघ मालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली.
या हंगामात एमपीएल मध्ये ४ संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये ४ संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या ०४ जूनपासून एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्स २ या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
-------
एमपीएल २०२५ सहभागी संघ-4S पुणेरी बाप्पा, PBG कोल्हापूर ट्स्कर्स ,रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स.
डब्ल्यू एमपीएल २०२५ सहभागी संघ-पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, पुष्प सोलापूर आणि रायगड रॉयल्स.
--------
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव ॲड. कमलेश पिसाळ, अपेक्स कौन्सिल सदस्य सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, सचिव चंद्रकांत रेम्बर्सू, मुकुंद जाधव, प्रकाश भुतडा, माजी अध्यक्ष दत्ता सुरवसे, दिलीप बचुवार, सोलापूर स्मॅशर संघाचे प्रतिनिधी शुभम बागुल, कर्णधार तेजल हसबनीस, आयकॉन खेळाडू ईश्वरी अवसारे, सुनील मालप, के. टी. पवार, उदय डोके, रोहित जाधव उपस्थित होते.