प्लॅटफॉर्म तयार केवळ ' उडी ' बाकी ! ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना पक्ष प्रवेशाच्या तयारीत

shivrajya patra

सोलापूर : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम सातलिंगप्पा म्हैत्रे काँग्रेस पक्षाचा 'हात' आणि 'साथ' सोडण्याच्या तयारीत आहेत. ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी इच्छुक असून त्या दृष्टीने त्यांची बैठक झाली आहे. माजी आमदार म्हैत्रे शिंदे दरबारी हजर झाल्याचं  बुधवारी सोशल मीडियावर झळकत आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म तयार असून केवळ ' उडी ' बाकी असल्याचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या अक्कलकोट दौऱ्यात 31 मे रोजी शिवधनुष्य उचलतील, असा राजकीय कयास आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेशाची चाचपणी करीत असल्याच्या वावड्या उडत होत्या, मात्र योग्य वेळी, योग्य पर्याय याचा निर्णय न झाल्याने त्यांच्या पक्षांतराचा वारू जागीच थंडावला होता, अशा राजकीय कुजबुजीत त्यांनी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून अक्कलकोटची विधानसभा लढवली होती. त्यात त्यांना पराभवाचा चेहरा पाहवा लागला होता.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यासोबत चर्चेच्या वेळी काँग्रेसचे शंकर म्हेत्रे, मल्लिकार्जुन काटगाव, अश्फाक बळवर्गी, भाजपचे  सिद्धाराम पाटील उपस्थित होते, असं बोललं जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 31 मे रोजी अक्कलकोट दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात माजी आमदार सिद्धाराम म्हैत्रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा सांगण्यात आलंय.


To Top