११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजन

shivrajya patra

पूर्व नियोजनाची पार पडली बैठक;“ एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ” यावर्षीची संकल्पना

सोलापूर :  दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यावर्षीचा ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात साजरा करण्यासाठी केंद्रीय संचार ब्यूरो आणि योग दिवस समन्वय समिती यांची भुतडा भवन येथे पूर्व नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये यावर्षीचा ११ वा योग दिन हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानामध्ये आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. 

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे सहभागी विद्यार्थी, युवा-युवती, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांना ४५ मिनिटांचा सामान्य योग प्रोटोकोलप्रमाणे योगाभ्यास घेण्यात येणार आहे. योग शिक्षकांसाठी रविवारी, २५ मे रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत शिवस्मारक, नवी पेठ येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

योगाचा प्रचार-प्रसार आणि जास्तीत जास्त नागरिक योग महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने बुधवारी, १८ जून रोजी सकाळी ७ वाजता दमाणी नगर येथून योग दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. योग दिनाच्या एक दिवस आधी सायंकाळी ५ वाजता हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर योगाभ्यासाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. 

यावर्षीच्या योग महोत्सवामध्ये जिल्ह्यातील पतंजली योग पीठ, योग असोसिएशन, योग सेवा मंडळ, विवेकानंद केंद्र, योग साधना मंडळ, भारतीय योग संस्‍था, हार्टफुलनेस इन्‍स्‍टि‍ट्युट, गीता परिवार आणि सर्वोदय योग साधना मंडळ सहभागी असणार आहेत.

या बैठकीला केंद्रीय संचार ब्यूरोचे सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, योग दिवस समन्वय समितीचे संयोजक  मनमोहन भुतडा, विवेकानंद केंद्राचे नंदकुमार चितापुरे, महेश गोंजारी, रवी कंटली, योग असोसिएशनचे दत्तगुरु वेदपाठक, माईंड फुल हॅपिनेस संतोष सासवडे, योग सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील आळंद, सुभाष जोशी, स्मिता शहा, भारतीय योग संस्थेचे दत्तात्रय चिवडशेट्टी, बाळासाहेब पाटील, सर्वोदय योग मंडळाचे अशोक गरड, जीवन अवताडे आणि योग साधना मंडळाचे बाबुशेठ सोनी उपस्थित होते.

To Top