वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची हिरज येथील रेशीम पार्कला भेट; शेतकऱ्यांशी साधला संवाद

shivrajya patra

सोलापूर : जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे हिरज येथील रेशीम पार्कला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शनिवारी, 17 मे रोजी भेट दिली. या भेटीत त्यांच्या समवेत आमदार सुभाष बापू देशमुख उपस्थित होते. 

मौजे हिरज रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ इमारतीची पाहणी करुन बहुसंख्येने उपस्थित रेशीम उद्योजक शेतकऱ्यांशी चर्चा केली, माहिती घेतली, शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी रेशीम बाजारपेठ चालू करणे व शेतकऱ्यांचे रखडलेले रेशीम उद्योगाचे अनुदान तरतूद उपलब्ध करुन देणेबाबत आश्वासन दिले. तसेच रेशीम कार्यालयास कमी असलेला कर्मचारी वर्ग तात्काळ भरण्यात येतील, असंही सांगितले. 

या सर्व बांबी लवकरात लवकर निरसन करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित केल्याचे सांगून त्यामध्ये सर्वांच्या विचारांने योग्य तो मार्ग काढून येत्या दोन महिन्यात मौजे हिरज येथील रेशीम मार्केट चालू करुन दिले जाईल, असे आश्वासीत केले.

आमदार सुभाष देशमुख यांनी मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून हिरज येथे रेशीम कोष खरेदी-विक्रीसाठी जागा उपलब्ध होऊन इमारत बांधकाम झालं आहे. या रेशीम कोष बाजारपेठ सुरु करण्यासबंधी शेतकऱ्यांनी मंत्री सावकारे यांना विनंती केली. यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मंत्री संजय सावकारे व आमदार सुभाष देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. 

रेशीम कार्यालयाचे रेशीम विकास अधिकारी विनित पवार व कर्मचारी वृंद यांचं काम चांगले आहे व ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचून रेशीम उद्योग विस्तार व विकासासाठी प्रयत्नशील असतात, असे उपस्थित रेशीम उद्योग शेतकऱ्यांनी सांगीतले. 

सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या 1017 शेतकरी 1260 एकरवर रेशीम शेती करीत असून त्यातून 4.00 लक्ष किलो रेशीम कोष उत्पादन झाले आहे.

सोलापूर जिल्हा हा पुढील कालावधीमध्ये 2000 एकर रेशीम लागवड पुर्ण करेल. त्यासाठी रेशीम कोष बाजारपेठ लवकरच सुरु होईल ज्यामूळे रेशीम उद्योजक शेतकऱ्यांना इतर राज्यात रेशीम कोष विक्रीसाठी जाण्याची गरज पडणार नाही. असे जिल्हयाचे रेशीम विकास अधिकारी  पवार यांनी सांगीतले.

यावेळी मंत्री सावकारे यांना निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, सांगोला व उतर सोलापूर अशा अनेक ठिकाणाहून रेशीम उद्योजक शेतकरी उपस्थित होते. आमदार सुभाष देशमुख या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

या कार्यक्रमास टेक्स्टाईलचे डिडिआर श्रीमती. उज्वला मॅडम, राम काका जाधव, हिरज गावचे सरपंच प्रशांत साबळे, डॉ. सोनवणे ओएसडी, वानखेडे, डॉ. संतोष थिटे,  बालाजी पवार (धाराशिव),  नवनाथ रसाळ, सौदागर पांडव इ. उपस्थित होते.

To Top