कासेगांव/संजय पवार : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवसह पंचक्रोशीला गुरुवारी सायंकाळी मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. सुमारे तीन तास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या अवकाळी पावसाची 94 मिमी नोंद झाल्याचं सांगण्यात आलं.
अवकाळी पावसात शेतकऱ्यांचा कांदा तसेच कडबा-वैरणी पावसात भिजल्या. अनेक ठिकाणी शेती बांध फुटल्यानं शेतातील माती वाहून गेल्याचं चित्र काही ठिकाणी दिसून आलंय. गेल्या 10 वर्षात प्रथमच असा वळिवाचा पाऊस पडला असल्याचे अनेक जाणकारांनी सांगितले. असंच काहीसं चित्र बक्षी हिप्परगे वरळेगांव वगळता उळेगांव, वडजी आणि खडकी परिसराचं आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतीचे मशागतीची कामाला वेग येणार आहे. खरीप हंगामात पेरणीपूर्वी कामाला वेग येणार आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या गाव तलावात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असून जवळपास अर्ध्यावर पाणी तलावात आल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई यापुढे जाणवणार नसल्याचं ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले.
सोयाबीन, मूग, उडीद, तूर भुईमूग आदी खरीप हंगामातील पिकासाठी हा पेरणी पूर्व पाऊस महत्त्वपूर्ण मानला जात असून यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतीच्या कामाला वेग येणार आहे.
