सोलापूर : सावधान ... ! पोलीस आयुक्तालयाच्या नागरिकांच्या मदतीसाठी सेवेत असलेल्या डायल ११२ वर तातडीचा कॉल करून पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. विनायक विलास गायकवाड असं आरोपीचं नांव आहे. कोणीही डायल ११२ अथवा इतर कोणत्याही माध्यमातून खोटे कॉल करू नयेत, असं आवाहन पोलिसांडून करण्यात आलं असून अन्यथा संबंधितांवर कायदेशिर कारवाई होऊन संबंधितास १ वर्षाचा कारवास किंवा दहा हजार रूपये द्रव्यदंड अशी शिक्षा होऊ शकते, असंही सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, 112 क्रमांकावरून आलेल्या कॉलवर पोकॉ/१७६० सोमनाथ वाघमारे (नेमणूक एमआयडीसी पोलीस ठाणे) हे २७ मार्च २०२५ रोजी पी.सी.आर मोबाईल १ मध्ये कर्तव्यावर असताना त्यांना मध्यरात्री रोजी ०१:४८ वा.डायल ११२ वरून कॉल आला की, "गणेश टेक्सटाईल्स, एमआयडीसी, सोलापूर येथे कॉलर घटनास्थळी असून कॉलरच्या भावाने मर्डर केला आहे " त्यावर ते गणेश टेक्सटाईल्स, एमआयडीसी, सोलापूर येथे गेले.
तेथे विनायक विलास गायकवाड (रा.१२९, निवारा नगर, सिद्ध हनुमान मंदिर जवळ, सोलापूर) हा मिळून आला. त्यावेळी त्याचेकडे चौकशी केली असता, त्यानेच डायल ११२ ला कॉल केला होता, असं सांगितले.
त्यानुसार त्याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली. त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. यावरून खात्री झाली की, विनायक विलास गायकवाड याने डायल ११२ वर कॉल करून खोटी माहिती दिल्याने त्याचेविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम २१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
