आमदार विजय देशमुख यांची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी
सोलापूर/सोहेल शेख : येथील उदयोन्मुख खेळाडूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण रूपाभवानी पुणे रोडलगत पर्ल गार्डनजवळील सुधारित विकास योजना आराखडा आरक्षण क्रमांक तीन आणि चार असून सहा एकर पालिकेच्या मालकीच्या आरक्षित जागेवर अद्यावत सोई सुविधांनी उपलब्ध असलेले क्रीडांगण खेळाडू आणि नागरिकांसाठी विकसित होणार असून याची पाहणी आमदार विजय देशमुख यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केली.
पुणे-मुंबईच्या धर्तीवर अद्ययावत सोयी सुविधांनी उपयुक्त असे क्रीडांगण शहरातील खेळाडूंना राज्यस्तर, राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेच्या सरावासाठी बनवण्याच्या सूचना आमदार विजय देशमुख यांनी दिल्या. या जागेवर व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, क्रिकेट, स्विमिंग पूल, फुटबॉल यासह कोचिंग सेंटर उभारण्यासंबंधीची चर्चा झाली. यासाठी लवकरात लवकर डीपीआर तयार करून तो राज्य शासन आणि केंद्रीय खेल मंत्रालयाकडे पाठवण्याची सूचना आमदार विजय देशमुख यांनी केली.
शासन दरबारी योग्य तो प्रयत्न करू, या भागातील नागरिकांचे आरोग्याचा विचार करता एक चांगले निसर्गाच्या सानिध्यातील वॉकिंग ट्रॅक यासह अनेक वैयक्तिक आणि सांघिक खेळांचे छोटे-मोठे क्रीडांगण या ठिकाणी होईल, अशी माहिती आमदार विजय देशमुख यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, माजी सभागृह नेता संजय कोळी, प्रभारी नगर अभियंता सारिका आकुलवार, मनपा क्रीडा अधिकारी भूषण जाधव, देविदास चेळेकर, प्रसाद कुलकर्णी, राहुल शाबादे, केदार बिराजदार, अविनाश बिडवे, सिद्धू गुब्याडकर, राजाभाऊ गायकवाड, यादगिरी कोंडा, विजय कोळी, बिसनूरकर, जोशी आदी या पाहणी दौऱ्यात होते.