सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी गजाआड असलेल्या आरोपी मनीषा मुसळे हिला रविवारी, दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं, बहुचर्चित आत्महत्या प्रकरणात सखोल तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधिकाधिक दिवसांची पोलीस कस्टडी मागणे स्वाभाविक होते, न्यायालयानं गुन्ह्याच्या तपास कामासाठी आरोपीस ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी त्यांचे पुत्र डॉ.अश्विन शिरीष वळसंगकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, वळसंगकर हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनिषा महेश मुसळे उर्फ मनिषा माने हिने डॉ. अश्विन यांच्यावर खोटे आरोप करून धमकी वजा पत्र पाठवल्याने त्यांचे वडिल डॉ. शिरीष यांनी मनीषा मुसळे-माने हिच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी, १८ एप्रिल रोजी रात्री राहते घरी स्वतःच्या बेडरूममधील अटॅच असलेल्या बाथरूम मध्ये स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्टलमधून कानशीलमध्ये गोळी घालून आत्महत्या केली. तिच डॉ. वळसंगकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची फिर्याद सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने (राहणार सोलापूर) हिच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक लकडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
संशयित आरोपी महिला अन् त्यात रात्रीची वेळ लक्षात घेऊन पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीनं आरोपी मनीषा मुसळे-माने हिला शनिवारी रात्री उशीरा अटक केली.
पोलिसांचा तपास ' सुसाईड नोट ' भोवती फिरत आहे. आरोपी मनीषाला रविवारी, दुपारी न्यायालयासमोर हजर केलं, न्यायालयाने आरोपीस ०३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.