सोलापूर : शहरातील मोदी परिसतील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी वस्तीतील दोन शालेय मुलींची शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची आहे. मनपा प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आरोप आरोप 'मी सोलापूर, माझे सोलापूर' परिवर्तन विकास समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी यांनी केला.
मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने रविवारी, 6 एप्रिल रोजी सकाळी विष्णु कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली समितीचे शिष्टमंडळ जगजीवन राम झोपडपट्टी येथील मृत झालेल्या विजया महादेव म्हेत्रे व ममता अशोक म्हेत्रे यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे कुटुंबीयांची व्यथा ऐकून घेतली.
यावेळी सत्य परिस्थिती पाहता मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे व त्यांचे अन्य सहकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे डेंग्यूमुळे या मुलींचा मृत्यू झाला आहे. त्या मृत्यूला कारण डेंग्यू असो किंवा दूषित पाणी असो, एकूण महापालिकेचा निष्क्रिय कारभारामुळेच त्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे, हे सत्य आहे. म्हणून त्यांच्या मृत्यूस महानगरपालिका जबाबदार आहे, असं विष्णू कारमपुरी यांनी यावेळी म्हटले.
आमचाही जीव धोक्यात आहे. आम्हाला वाचवा, असा तेथील महिलांचा आक्रोश होता. या परिस्थितीत प्रथमतः इतरांना कुठल्याही प्रकारचा जीवितास धोका होऊ नये, म्हणून ताबडतोब बापू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये नाले सफाई, ड्रेनेज सफाई, दूषित पाणीपुरवठा थांबवणे, उघड्या गटारी साफ करणे व इतर प्रकारचे स्वच्छता मोहीम राबविण्यात यावे, अशी मागणी मनपा प्रशासनाला विष्णू कारमपुरी यांनी केली.
तत्पूर्वी, 28 मार्च रोजी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना सोलापूर शहरातील झोपडपट्टी भागात स्वच्छता मोहीम राबवावी, असं निवेदन देण्यात आले. तरीही अद्याप स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली नाही, त्यातून हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. आता तरी झोपडपट्टी स्वच्छता मोहीम हाती घ्या, अन्यथा मनापा आयुक्त कार्यालासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जगजीवनराम झोपडपट्टी येथे सांत्वनपर भेटी दरम्यान रेखा आडकी , विठ्ठल कु-हाडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, रमेश चिलवेरी, सैदप्पा जंगले, पप्पू शेख,आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळी : बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे म्हेत्रे कुटुंबीयांची सांत्वन करताना विष्णू कारमपुरी, विठ्ठल कुऱ्हाडकर, रेखा आडकी आदी उपस्थित होते.