सोलापूर : येथील सिध्देश्वर पेठेतील घरफोडीच्या दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेने गजाआड केलेला आंतरराज्यीय गुन्हेगाराचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सरकार पक्षाचे वतीने अॅड डॉ. श्रीमती अनघा लिंबाळे व अॅड श्रीमती मुनजरीन जेलर यांनी आरोपीवर दाखल गुन्हे, शिक्षा भोगूनही त्याच्या वर्तणुकीत न झालेला बदल आरोपी अनिलकुमार राजभर पुन्हा त्याच पध्दतीने गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सिद्धेश्वर पेठेतील सेंटर पार्कमधील रहिवासी कादर राजूमियाँ शेख हे ११ मार्च रोजी सकाळी घर बंद करुन, कुलूप लावून नोकरीचे ठिकाणी गेले. सायंकाळी ०८:३० वा.चे कामावरुन परत घरी आले. त्यावेळी त्यांच्या घराचा मुख्य दरवाज्याचा कडी व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यानं कपाटातील सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व सुमारे १० तोळे वजनाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सपोनि शैलेश खेडकर व पथकास २० मार्च रोजी मिळालेली माहिती व पथकाने संकलित केलेली तांत्रीक माहिती या दोन्ही बाबींचा सहाय्याने पथकाने, दिवसा घरफोडी करणारा रेकॉर्डवरील सराईत हायप्रोफाईल आरोपी नामे अनिलकुमार मिस्त्रीलाल राजभर (वय-३८ वर्षे, रा. ग्रा.पो. बोदरी, ता. केराकत जि. जौनपुर राज्य-उत्तरप्रदेश) यास तो पुन्हा घरफोडी करण्यासाठी सोलापूर शहरात आलेला असताना, त्यास युनिटी अपार्टमेंट जवळ सापळा लावून घरफोडीची करण्याच्या साहित्यासह ताब्यात घेतले.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपी अनिलकुमार राजभर याने गुन्हा केल्याची कबूली दिल्याने, त्यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. अटक कालावधीत सपोनि शैलेश खेडकर व पथकानं आरोपीकडं तपास केला असता, त्याने मागील महिन्यात सिन्नर (जिल्हा नाशिक) येथे देखील एक घरफोडीचा गुन्हा केल्याची कबूली दिली.
सपोनि शैलेश खेडकर व पथकाने गुन्हयाचे तपासात आरोपीकडून ११० ग्रॅम (११ तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने, व एकुण ११३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा सरकारी किंमतीनुसार ०३,१९,७०० रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला व अत्यंत कौशल्यपूर्वक दिवसा घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले होते.
या आरोपीस न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर, आरोपीने त्याच्या वकिलामार्फत न्यायालयात जामीन मिळणेकामी रितसर अर्ज केला होता. गुन्ह्याचे तपास अधिकारी स.पो.नि. शैलेश खेडकर यांनी आरोपी अनिलकुमार राजभर याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात यापूर्वी दाखल असलेल्या ३५ गुन्ह्याची माहिती संकलित करुन न्यायालयात सादर केली.
त्यासोबत आरोपीस यापुर्वी घरफोडीच्या गुन्ह्यात मुंबई व नवी मुंबई येथील न्यायालयाने एकूण ०७ गुन्ह्यांमध्ये दिलेल्या शिक्षेबाबतची माहिती संकलीत करुन न्यायालयात सादर केली.
आरोपी अनिलकुमार राजभर हा सराईत गुन्हेगार असल्याने व त्याच्या वर्तनामूळे सर्वसामान्य नागरीकांचे मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने, मिळविलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने आरोपीस जामीन नाकारण्यात यावा, असं तपासी अधिकारी यांनी म्हणणे सादर केले.
सरकार पक्षाचे वतीने अॅड डॉ. श्रीमती अनघा लिंबाळे व अॅड श्रीमती मुनजरीन जेलर यांनी आरोपीवर दाखल असलेले गुन्हे, शिक्षा भोगूनही त्याचे वागणुकीत काही एक फरक पडत नसल्याचे तसेच आरोपी पुन्हा त्याच पध्दतीने गुन्हे करत असल्याचे, निदर्शनास आणून दिले. आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी स.पो.नि. शैलेश खेडकर (गुन्हे शाखा) सरकारी अभियोक्ता अॅड. डॉ. श्रीमती अनघा लिंबाळे व अॅड. श्रीमती मुनजरीन जेलर तसेच कोर्ट कामकाजात मदत करणारे पोलीस अंमलदार संदीप जावळे, मल्लिनाथ रुपनर, हनुमंत नलवडे यांनी केली.