मोहोळ/यासीन अत्तार : मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत मोहोळ तहसिल पुरवठा विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्वांना ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना हे ई-कार्ड रास्तभाव दुकानदार यांच्या माध्यमातून घरपोच देण्यात येणार आहे. या घरपोच ई-कार्ड योजनेचा शुभारंभ शुक्रवारी, 11 एप्रिलपासून तहसिलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते मोहोळ शहरातून करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत दिनांक 11 ते 15 एप्रील या कालावधीत तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनेच्या एकुण 2948 शिधापत्रिकाधारकांना ई-कार्ड घरपोच वितरीत करण्यात येणार आहे. तर दिनांक 16 एप्रिलपासून प्राधान्य कुटूंब योजना व एनपीएच (केशरी) योजनेतील शिधापत्रिकाधारक यांना ई कार्ड वितरण होणार आहे.
या उपक्रमाचे गावनिहाय नियोजन करण्यात आले असून गावातील सरपंच, पोलिस पाटील, रास्तभाव दुकानदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच नायब तहसिलदार यांच्या उपस्थितीत ई-कार्ड चे वितरण होणार आहे.
... Visit Us :
www.shivrajyapatra.co.in
विद्यार्थी तसेच नागरिक यांना विविध कामासाठी शिधापत्रिकेची आवश्यकता असून त्यांचा वेळ, श्रम व पैसा याची बचत व्हावी, या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम मोहोळ चे तहसिलदार सचिन मुळीक यांच्या संकल्पनेतून आला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी मोहोळ श्रीमती सोनाली निटुरे, पुरवठा निरीक्षक मोहोळ महालिंग लोंढे, संगणक सहाय्यक अमोल कुंभार आणि सुरज पाटील हे हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन तहसिलदार सचिन मुळीक यांनी केलं आहे.