रमजानुल मुबारक - २८....जिहाद म्हणजे वाईट प्रवृत्तीशी लढा

shivrajya patra

 

वित्र रमजान महिना उद्या पूर्णत्वास जात आहे. गेले महिनाभर रोजे धरून आपल्या स्वतःवर नियंत्रण मिळवत आपल्या इच्छा-आकांक्षा यांना नियंत्रित करून अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी संयम आणि धिरोदात्तपणा वाढीस लावण्यासाठी या महिन्याचे पालन आपण केलेले आहे. एक महिनाभर केलेली उपासना पुढील वर्षभर नव्हे तर आयुष्यभर आपल्यामध्ये कायम राहण्यासाठी हे संस्कार निश्चितपणे उपयोगी पडणार आहेत. 

आपल्यातील चुकीच्या सवयी,  विचारसरणी भावना, कायमस्वरूपी नष्ट करून सदाचारी जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणा या माध्यमातून निर्माण करण्याचे कार्य रमजान महिन्यामध्ये झाले आहे. ते टिकविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मनाची एकाग्रता, विचारांची परिपक्वता आणि ध्येयाप्रति असलेली निष्ठा या गोष्टींमुळे आपल्यामध्ये चांगल्या सवयी निश्चितपणे वाढीस लागतील, अशी आशा आहे.

इस्लामी संस्कृतीत वापरला जाणारा एक प्रमुख शब्द म्हणजे जिहाद. जिहाद शब्दाबद्दल व त्याच्या एकूणच कार्याबद्दल खूप गैरसमज आहेत. जिहादचा अर्थ आहे संघर्ष.प्रत्येक चुकीच्या गोष्टीच्या विरोधात केलेला संघर्ष म्हणजे जिहाद.तो अनेक प्रकारचा असू शकतो.शत्रूविरुद्ध दिलेला लढा म्हणजे जिहाद असा प्रामुख्याने समज आहे आणि तो काही अंशी योग्य देखील आहे.

माणसाच्या जीवनामध्ये ज्या वाईट प्रवृत्तींनी शिरकाण केले आहे, त्याविरुद्ध केलेला उठाव म्हणजे देखील जिहाद होय. अन्याय, अत्याचार, जुलूम या गोष्टीविरुद्ध आवाज उठवून संघर्ष करणे म्हणजे जिहाद करणे होय. ज्यावेळी टोकाचा विरोध होतो आणि विनाकारण एखादी गोष्ट लादली जाते, त्यावेळी जो संघर्ष करावा लागतो तोच जिहाद.

आज तलवारी घेऊन लढाया होत नसल्या तरी इतर मार्गांनी एकमेकांच्या विरोधात कट-कारस्थाने करण्याची कामं सुरू आहेत. जागतिक पातळीवर अमेरिका, रशिया यासारख्या बलाढ्य शक्ती इतर देशांना वेठीस धरून आपली दादागिरी करीत आहे.अशावेळी तुर्की सारखं छोटे राष्ट्र त्यांना निकराने लढा देत आहे. तुर्कीचा हा संघर्ष म्हणजेच जिहाद होय. इसराइल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष म्हणजे जिहाद आहे.

कोणावरही अन्याय किंवा अत्याचार किंवा जुलूम करू नका, ही इस्लामची शिकवण आहे. पण जर कोणी मुद्दामहून या गोष्टी करीत असेल आणि समजावून ही थांबत नसेल तर त्याविरुद्ध उभारलेला लढा हा जिहाद म्हणून संबोधला जातो. आपल्या समाजात अनेक चुकीच्या गोष्टी सुरू आहेत. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ लावून दुरुपयोग होत असताना यंत्रणा मात्र फक्त पहात आहे. 

सर्वसामान्य लोक न्यायासाठी अधीर झालेले आहेत. या सर्व घटकांना आधार देण्यासाठी जो लढा उभारला जातो, तो जिहाद म्हणून संबोधला जातो. आज सामान्य माणूस खूप भरडला जात आहे. त्याला आधार देण्यासाठी कोणीतरी पुढे येण्याची आवश्यकता आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. धार्मिक आणि जातीय संघर्ष निर्माण करून कोणी तरी आपले मनसुबे फत्ते करू पाहत आहे.जे जे चांगले आहे ते स्वीकारून चुकीच्या पद्धती विरुद्ध एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे, याला सामाजिक जिहाद म्हणता येईल.

लव जिहाद हा प्रकार इस्लाममध्ये कुठे ही अस्तित्वात नाही. तो एका विशिष्ट विचार शैलीच्या यंत्रणेने निर्माण केलेला शब्द आहे. प्रत्येक समाजाने आपल्या तरुण मुलामुलींवर बारीक लक्ष ठेऊन त्यांच्या एकूण वर्तणुकीचे निरीक्षण करून योग्य उपाययोजना केली तर लव जिहाद हा शब्द हद्दपार होईल. प्रेमाच्या नावाखाली होणारा हा प्रकार कोणत्याही समाजाच्या कुटूंबाची सामाजिक मानहानी करणारा असतो.यामध्ये वेगळ्या आकर्षणापोटी जर कोणी प्रवाहित होत असेल तर त्याला रोखण्याची जबाबदारी ही समाजातील सर्व घटकांची आहे. (क्रमशः) 

सलीमखान पठाण-9226408082.

To Top